घर Pune City व्यावसायिक प्रामाणिकता, नावीन्य जपायला हवे: डॉ. नितीन करीर यांचे प्रतिपादन

व्यावसायिक प्रामाणिकता, नावीन्य जपायला हवे: डॉ. नितीन करीर यांचे प्रतिपादन

30
0

श्रीकांत साबळे लिखित ‘संघर्षयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : प्रतिनिधी

“प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी, संघर्ष असतोच; त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. या अडचणी, संघर्ष बाजूला ठेवून स्वतःला झोकून देत संवेदनशीलपणे लोकसेवेचे काम करत राहायला हवे. मूल्यांशी तडजोड न करता तत्वनिष्ठ भावनेने समाजहिताचे काम करताना व्यावसायिक प्रामाणिकता, नावीन्य जपायला हवे,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी केले.

श्रीकांत साबळे लिखित, इग्नाइट पब्लिकेशन प्रकाशित ‘संघर्षयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. करीर यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, पुण्यनगरीचे संचालक भावेश शिंगोटे, लेखक श्रीकांत साबळे, इग्नाइट पब्लिकेशनचे योगेश माने आदी उपस्थित होते.

या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्रावण हर्डीकर, रमेश घोलप, सागर डोईफोडे, प्रवीण गेडाम, राजेश पाटील, डॉ. अविनाश ढाकणे, कुणाल खेमनार, विशाल सोळंकी, पोलीस अधिकारी निखिल पिंगळे, वैभव निंबाळकर यांचा विशेष सन्मान, तसेच मांडणी व सजावट करणाऱ्या प्रभाकर भोसले यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. नितीन करीर म्हणाले, “श्रीकांत साबळे यांनी चिकाटीने या पुस्तकाची निर्मिती करत अनेकांच्या प्रेरक कहाण्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने संघर्षाला सामोरे जात नवीन काहीतरी कसे निर्माण केले, याचा प्रवास पुस्तकात आहे. पुस्तक, शाळा, मित्रमंडळी, सिनेमा, नाटक, लोकांकडून आपण सतत शिकत राहतो. आपापल्या व्यवसायात चांगले कसे करता येईल, याचा मार्ग दाखवणारे हे पुस्तक आहे.”

“प्रशासकीय सेवेत कार्यरत व्यक्तीनी समाजहिताची भूमिका घेत कठीण परिस्थितीतून न्याय्य भावनेने मार्ग काढायला हवा. आपल्या समाधानात समाजाचे हित असते. ज्ञान, तत्वे व उद्दिष्ट्ये या तीन गोष्टी कायम जपाव्यात. जिद्दीने, क्षमतेने स्वत:चे विश्व निर्माण करताना समाजसेवेचा दृष्टीकोन सोडता कामा नये.”

सागर डोईफोडे म्हणाले, “देशाच्या विविध भागातील अधिकाऱ्यांचा प्रवास या पुस्तकातून मांडला आहे. एकप्रकारे हा अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीचा दस्तावेज आहे. अनेकांसाठी तो प्रेरक ठरेल. समाजासाठी काम करण्याची आस, यश मिळवण्याची जिद्द आणि त्यासाठी केलेले परिश्रम याची जाणीव ठेवून काम करावे.”

रमेश घोलप म्हणाले, “आयुष्यात संघर्ष करून परिस्थितीवर मात करत यश मिळवता येते. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. अपयश आले तरच; आपण पेटून उठतो आणि यश मिळवतो. संघर्षातून संवेदनशीलता विकसित होते. परिस्थिती हीच प्रेरणा मानून सकारात्मक काम करत रहावे.

स्वागत-प्रास्ताविकात श्रीकांत साबळे यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडला. प्रशासकीय सेवेत यश मिळवताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, अधिकारी झाल्यावर आपल्या कामातून उमटवलेला ठसा, स्वतःची बनवलेली विशेष ओळख आणि त्यातून नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, अशी कारकीर्द असलेल्या अधिकाऱ्यांच्या संघर्षाची कहाणी यात आहे.

डॉ. अमिताभ गुप्ता, भावेश शिंगोटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अक्षय घोळवे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश माने यांनी आभार मानले.

डॉ. करीर यांच्याकडून आठवणींना उजाळा

मुख्य सचिव पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. बालगंधर्व रंगमंदिर आणि माझ्या अनेक आठवणी आहेत. आता बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास प्रस्तावित असल्याने शेवटच्या काही कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम आहे. येथे भव्य नाट्यगृह, कलादालन होणार आहे, ही आनंदाची बाब असली, तरी बालगंधर्वच्या विकासात आजवर अनेक अधिकाऱ्यांनी योगदान दिले, त्यात मलाही योगदान देता आल्याचा आनंद वाटतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा