घर Pune प्रभातस्वर रागसंगीत मैफलीत प्रतिभावान गायिका शाश्वती मंडल यांना ऐकण्याची संधी

प्रभातस्वर रागसंगीत मैफलीत प्रतिभावान गायिका शाश्वती मंडल यांना ऐकण्याची संधी

27
0

पुणे : स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर या रागसंगीताच्या नवीन वर्षातील पहिल्या मैफलीत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका शाश्वती मंडल यांचे गायन होणार आहे. जन्मशताब्दीवर्षानिमित्त सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांना ही मैफल समर्पित करण्यात आली आहे, अशी माहिती अपर्णा केळकर यांनी निवेदनाद्वारे दिली.

प्रभातकालीन रागांचे सादरीकरण हे प्रभातस्वर मैफलीचे वैशिष्ट्य. प्रथितयश कलाकारांचे गायन/वादन आणि त्यांच्याशी संवाद असे स्वरूप असलेली नव्या वर्षातील पहिली मैफल रविवार, दि. 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजता डेक्कन जिमखाना येथील गोखले इस्टिट्यूटच्या आवारात असलेल्या ज्ञानवृक्षाखाली आयोजित करण्यात आली आहे. कौशिक केळकर (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) संगतकाराच्या भूमिकेत असून शाश्वती मंडल यांच्याशी मंजिरी धामणकर संवाद साधणार आहेत.

शाश्वती यांचा जन्म ग्वाल्हेरमधील संगीतकारांच्या कुटुंबात झाला. त्यांनी गायनाचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातोश्री कमल मंडल यांच्याकडून घेतले. पुढे आजोबा पंडित बाळाभाऊ उमदेकर यांच्याकडून त्यांनी गायनाची तालिम घेतली. पंडित उमदेकर ‌‘कुंडलगुरू’ हे ग्वाल्हेरमधील राजदरबारात दरबार-गायक (दरबारी संगीतकार) होते. 1987 ते 1992 या कालावधीत शाश्वती यांनी ग्वाल्हेर घराण्याचे थोर गायक पंडित बाळासाहेब पुंछवाले यांच्याकडून टप्पा गायन व उपशास्त्रिय गायनाचे शिक्षण घेतले. पुर्णिमा चौधरी यांच्याकडून शाश्वती यांना ठुमरी गायनाचे मार्गदर्शन लाभले. तर ध्रुपद गायकीचे धडे त्यांनी गुंदेचाबंधू यांच्याकडे गिरविले. तर गझल गायनाची तालिम सरबत हुसेन यांच्याकडून मिळाली. कुमार गंधर्व गायकीचा अभ्यास शाश्वती यांनी दिल्ली येथील गायक मधुप मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली केला. ताना-मुरक्या तसेत टप्पा गायन क्षेत्रात शाश्वती यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीसह ठुमरी, ध्रुपद, गझल, कर्नाटकी पल्लवी आणि जयपूर-अत्रौली घराण्याची परंपरेचा अभ्यास केलेल्या शाश्वती मंडल या प्रतिभावान गायिका आहेत.

प्रभातस्वर राग संगीत मैफल मालिकेअंतर्गत या वर्षात आयोजित करण्यात येणार असलेल्या सांगीतिक मैफली पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांना समर्पित असणार आहेत, असे अपर्णा केळकर यांनी सांगितले.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा