पुणे: प्रतिनिधी
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. प्रभा अत्रे या शास्त्रीय संगीत जगतातील अत्यंत वंदनीय व्यक्तिमत्व होत्या. पंडित भीमसेन जोशी यांच्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता अत्रे यांच्या गायनाने होत होती.
यावर्षी आजारपणामुळे त्या जाऊ शकल्या नाही. संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रभा अत्रे यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमी अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
प्रभा अत्रे यांनी सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेतले. अत्रे यांनी संगीताच्या शिक्षणाबरोबरच फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर कायद्याची पदवी संपादन केली. संगीत अलंकार आणि संगीत प्रवीण या पदव्याही त्यांनी मिळवल्या.
अत्रे यांनी चिंतुबुवा दिवेकर, गणपतराव बोडस, प्रसाद सावकार, मास्टर दामले, भालचंद्र पेंढारकर, राम मराठे, प्रभाकर पणशीकर यांच्यासह नाट्यक्षेत्रात काम केले. गायनाबरोबरच संगीत क्षेत्रातील त्यांचा व्यासंग ही मोठा होता. त्याच्या आधारावर त्यांनी संगीतावर अभ्यासपूर्ण पुस्तके देखील लिहिली आहेत.