पिंपरी / प्रतिनिधी : केंद्र व राज्य सरकार रिक्षा चालक, मालकांना दुय्यम वागणूक देत आहे. रिक्षा चालकांचे प्रश्न शासनदरबारी धूळ खात पडून असताना त्याकडे कोणीही गांभिर्याने बघायला तयार नाही. त्यामुळे रिक्षा चालक, मालकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. सरकारच्या ढिसाळ कारभारानेच 28 नोव्हेंबर पासून रिक्षा बंद आंदोलन सुरु होत आहे. याला सरकारच जबाबदार असल्याची टीका, महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने पिंपरी येथील कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस शहरातील रिक्षा स्टँड प्रमुख उपस्थित होते. या वेळी बाबा कांबळे बोलत होते. या वेळी,लक्ष्मण शेलार,बाळासाहेब ढवळे, रविंद्र लंके,अनिल शिरसाठ,संजय दौंडकर, उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा बंद करून नागरिकांची गैरसोय व्हावी असा आमचा उद्देश नाही. मात्र गेल्या काही दिवसापासून सातत्याने आंदोलन, मोर्चे आयोजित करूनही रिक्षा चालक, मालकांना न्याय मिळत नाही. सतत पाठपुरावा करूनही रिक्षा चालकांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ रिक्षा बंद आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे. या बंदला सरकार जबाबदार असून त्यांच्या ढिसाळ नियोजनानेच हे आंदोलन घ्यायला भाग पाडले आहे. प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हे आंदोलन सरकारनेच रिक्षा चालकांवर लादले असल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला. सरकारला जनतेची काळजी नाही. प्रवाशांची काळजी नाही, रिक्षा चालकांची काळजी नाही. यामुळे रिक्षा बंदचे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले.
बाबा कांबळे म्हणाले की, प्रवासी क्षेत्रामध्ये भांडवलदारांना मोठ्या प्रमाणामध्ये रस असून त्यांनी करोडो रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रासाठी केली आहे. भांडवलदार वाहतूक क्षेत्रामध्ये आल्यामुळे पूर्वपदावर आलेल्या वाहतूक व्यवस्था मेटाकुटीला आल्या आहेत. या मध्ये रिक्षा, एसटी, पीएमपीएल आदींचा समावेश आहे. बेकायदेशीर दुचाकीमुळे तर रिक्षा चालकांचे अक्षरशा कंबरडे मोडले असून रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे. अनेकदा दिवसभरात एक दमडीही मिळत नसल्याने घर चालवायचे कसे असा सवाल ते उपस्थित करत आहेत. मोठ्या भांडवलदार उद्योजकांमुळे व सरकारने त्यांना मुक्तपणा दिल्यामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे. सरकारने तातडीने दुचाकी व्यवसाय बंद करावा. रिक्षा चालक मालकासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. फायनान्स कंपन्यांकडून होणारी बेकायदेशीर वसुली थांबवावी. मुक्त परवाना बंद करून इलेक्ट्रिक गाडी परवाना अंतर्गत आणावा, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.
27 नोव्हेंबर पासून रिक्षा बंद आंदोलनात सहभागी व्हा : बाबा कांबळे
रिक्षा बंद आंदोलनात महाराष्ट्र रिक्षा पंचायतने सहभाग घेतला आहे. संघटनेच्या सहभागामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरात ९० टक्के पेक्षा अधिक रिक्षा चालक संघटनेला जोडले आहेत. तर पुण्यामध्ये ५० टक्के पेक्षा अधिक रिक्षा संघटना महाराष्ट्र रिक्षा पंचायतशी संलग्न आहेत. महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांनी रिक्षा बंदमध्ये पुढाकार घेतल्यामुळे हे आंदोलन यशस्वी होईल अशी आशा निर्माण झाली असून त्यामुळे संपाची तीव्रता वाढली आहे. या आंदोलनात रिक्षा चालक, मालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे.