घर Pune जिद्दीने, कृतार्थ भावनेने केलेले कार्य म्हणजे कर्मयोग : डॉ. सदानंद मोरे

जिद्दीने, कृतार्थ भावनेने केलेले कार्य म्हणजे कर्मयोग : डॉ. सदानंद मोरे

19
0

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे भूषण कटककर, मुक्ता भुजबले यांचा जिद्द पुरस्काराने गौरव

पुणे : प्रतिनिधी

गरजवंतांपर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देणे हे खरे सात्विक दान असते. ‌‘सुवानीती’च्या माध्यमातून व्यक्तिसापेक्ष असे संस्थात्मक काम सुरू आहे. आपण समाजाचे देणे लागतो या हेतूने, कृतार्थ भावनेने, जिद्दीने केलेले कार्य म्हणजे कर्मयोगाचा भाग असतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

सुवानीती फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू महिला, मुली, मुले, शाळा, मजूर वस्त्यांमध्ये जीवनोपयोगी वस्तू पुरविणारे भूषण कटककर आणि मुक्ता भुजबले यांना रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे जिद्द पुरस्कार डॉ. मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

पुरस्कारार्थिंसह रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि रंगत-संगत प्रतिष्ठान काव्य विभागाच्या कार्याध्यक्षा मैथिली आडकर व्यासपीठावर होत्या. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित हा पंधराशेवा कार्यक्रम होता.

डॉ. मोरे पुढे म्हणाले, गरजू व्यक्तींपर्यंत मदत योग्य वेळी पोहोचली तर भविष्यात प्रश्न उद्भवत नाहीत. आपल्या संस्कृतीत दानाचा संबंध पुण्याशी जोडला गेलेला आहे. मदतीविषयी दातृत्वाची भावना असता काम नये. समाजासाठी नि:स्वार्थ भावनाने काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही गौरवाची बाब आहे, अशा शब्दात ॲड. प्रमोद आडकर यांच्या उपक्रमाचे डॉ. मोरे यांनी कौतुक केले.

स्वागतपर प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, दुसऱ्यांकरता काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या फार कमी आहे. व्रतस्थपणे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा गेल्या 31 वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून सन्मान करीत आहोत.

सत्काराला उत्तर देताना भूषण कटककर म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांच्या हातात मोबाईल दिसतात; पण भविष्यात करिअर कशात करायचे असते याचे त्यांना भान नसते. शिक्षण अर्धवट सोडणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण आजही अधिक आहे. मुलींची शिक्षणाची इच्छा असूनही त्यांना शिक्षणापासून परावृत्त केले जाते. अशा परिस्थितीत संवाद ही खऱ्या अर्थाने गरज आहे. आमच्या कार्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा पुरस्कार आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

मुक्ता भुजबले म्हणाल्या, इतरांची दु:खे पाहिल्यानंतर आपली दु:खे किती छोटी आहेत हे जाणवले. अनेकांची दु:खे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत; पण सुवानीतीच्या माध्यमातून दु:खीतांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सेवेचा वसा प्रत्येक जन्मात घ्यायचा आहे.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा परिचय निरुपमा महाजन यांनी केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्र वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले. रंगत-संगत प्रतिष्ठानच्या पंधराशेव्या कार्यक्रमानिमित्त ॲड. प्रमोद आडकर यांचा भूषण कटककर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सदानंद मोरे यांनी सादर केलेल्या शेरोशायरीने झाली. कविसंमेलनात डॉ. ज्योती रहाळकर, सीताराम नरके, दयानंद घोटकर, तनुजा चव्हाण, डॉ. दाक्षायणी पंडित, विजय सातपुते, मीना सातपुते, डॉ. राजश्री महाजनी, दीपक करंदीकर, भालचंद्र कोळपकर, प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे यांचा सहभाग होता. अपर्णा डोळे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा