घर Pimpri-Chinchwad आम्ही भाग्यवान ; एका कार सेवकाच्या मुलीचे मनोगत

आम्ही भाग्यवान ; एका कार सेवकाच्या मुलीचे मनोगत

36
0

लेखिका – वसुधा एकनाथ उपाख्य महेश कुलकर्णी

ज्या दिवशी २२ जानेवारी हा आजचा रामलल्ला प्रतिष्ठापना दिवस घोषित झाला, मला आठवते, एक वेगळीच भावना मनात दाटून येत होती. त्यानंतर अनेकदा मन भूतकाळातील आठवणींनी भरून यायचे. वर्तमानात मंदिराविषयी ज्या बातम्या येत होत्या, त्यामुळे दिवस जातील तसे एक स्वाभिमानाची अत्यंत अभिमानाची भावना उचंबळून यायची.©️माननीय पंतप्रधान मोदीजी हेही जेव्हा त्यांच्या भाषणात म्हणाले, की त्यांच्यासाठी हा भावूक क्षण आहे, तेव्हा मला असे जाणवून गेले की मी त्यांना समजू शकत आहे. असे का ???©️

वर्ष १९९२
मी ३ वर्षाची. माझ्या पेक्षा वयाने एक वर्ष मोठी माझी बहिण. आई नोकरी करणारी. साधं ८ बाय १० च घर होत आमचं. तशी म्हणायला आई बाबांच्या संसाराची सुरुवातच आणि माझे बाबा १९९२ ला अयोध्येला कार सेवेसाठी गेले. त्यावेळी घरात काय घडलं, आई वडिलांमध्ये काय बोलणं झाल, याविषयी माझं ज्ञान तेव्हाही शून्य. ते कधी पर्यंत ? तर २०१९ या वर्षी सर्वोच्च न्यायालयानेही ‘मंदिर वही बनायेंगे’ हा निर्णय देईपर्यंत. कारण तो निकाल आल्यानंतर अनेक कारसेवकांप्रमाने माझ्या बाबांच्याही मुलाखती घेण्यात आल्या. बाबांनी त्यात जे सांगितले तेव्हा अंगावर अक्षरशः काटा आला होता. ते वाचून ऐकून मन भरून आलं होत. कारण आता मी स्वतः एक गृहिणी होते आणि लवकरच आईही होणार होते. बाबांनी त्या सर्व मुलाखतीत घटनाक्रम, मनाची स्थिती सांगितलीच; पण आईचे आणि आमचेही आभार मानले होते. आम्ही जाऊ दिले नसते, तर हा क्षण त्यांच्याही आयुष्यात आला नसता. ‘आयुष्यात एकदा तरी देशाचा इतिहास बदलनाऱ्या घटनांमध्ये मी आणि माझे कुटुंब यांचा खारीचा वाटा आहे, याचा मला अभिमान आहे, आणि कायम राहील, असे ते तेव्हा म्हणाले होते.©️

वर्ष २००२
घरात माझ्या आजोबांपासून रा. स्व. संघ, पुढे जनसंघ आणि त्यापुढे भारतीय जनता पक्षाचे कार्य असल्यामुळे अर्थातच हिंदू, हिंदुत्व आणि राजकारण समाजकारण यांच्या चर्चा होणे, वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळणे, ऐकायला मिळणे, भरपूर वाचायला मिळणे, हे मला रोजचे होते. कथा कादंबऱ्या वाचायच्या तर तेही कोणत्या ? हेही बाळकडू आम्हाला तेव्हाच घरातील वातावरणतून मिळाले होते. अशातच (वर्ष २००२-३ मध्ये बहुधा) आमच्या घरी ‘बखर अयोध्येची’ हे पुस्तक आले. डॉ. गिरीश आफळे लिखित हे केवळ पुस्तक होते का ? तेव्हा असेलही माझ्यासाठी; पण आज वाटते ती माझ्यासाठी वैचारिक क्रांती होती. जी त्यांच्याप्रमाणे अनेक लेखकांनी आपल्या लेखणीने वेळोवेळी केली आणि राम मंदिराचा लढा जिवंत ठेवण्यात आपल्या लेखणीने अमूल्य योगदान दिले. ©️ काय नव्हतं त्या पुस्तकात ? पानोपानी पुरावे होते, सणावल्यासह कधी काय घडले, कोणी काय केले, कोण लढले कोणी विरोध केला याचा घटनाक्रम होता. थोडक्यात स्पष्ट शब्दात सांगायचे तर ‘आमच्या रामाला त्याच्याच घरातून बळाने बाहेर काढले गेले आहे, हे स्वतः बाहेर काढणाऱ्यानेही लिहून ठेवले आहे; पण आता त्या बाबरचेच वंशज ते घर रामाचे कसे ? याचे पुरावे आमच्याकडे म्हणजे मालका कडेच मागत आहे आणि हे घ्या पुरावे, ते मंदिर रामाचे आहे आणि तिथे मंदिर बनणारच हा एक प्रकारचा आक्रोश त्या पुस्तकात ठायीठायी मला दिसला होता. त्या पुस्तकाने माझ्या बुद्धिवादी मनाची पूर्ण निश्चिती करून दिली, की हिंदूंवर अन्याय झाला आहे आणि होऊ दिला जात आहे. पण जागा रामाचीच आहे.©️

वर्ष २०१९
यावर्षी मी गरोदर होते. घरात अखंड राम जप लावून ठेवणे, ऐकणे, स्वामी वरदानंद भारती यांचे पोवाडे हे सर्व सुरू होतेच. डोहाळे यांचेच होते. पण एक दिवशी अचानक मला ‘बनायेंगे मंदिर’ आणि आरंभ हैं प्रचंड या दोन गाण्याची आठवण झाली आणि मी लूप मोड वर ते ऐकू लागले. मला आठवते, मी वीरश्रीने भारावून गेले होते. कित्येक दिवस मी ते ऐकत होते.
आणि अशातच पुढे तो निकालाचा दिवसही आला. या निकालाने दोन गोष्टी केल्या. ते म्हणजे प्रभू श्रीराम आणि त्यांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तबच केले गेले. जे अस्तित्व नाकारण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली होती. काँग्रेसने असे करून केवळ भारताच्या इतिहासाशीच सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसाशी द्रोह केला नव्हता, तर कोट्यवधी हिंदूंच्या श्रध्देचा अपमान केला होता. हे सर्व त्या दिवशी धुवून निघाले होते.©️ पुन्हा एकदा मन भारावून गेले. आमच्या घरात देवासमोर साखर ठेवली गेली. दिवे लावले आणि पोटावर हात ठेवून माझ्या बालांनाही आज काय घडले आहे आणि तुम्ही अशा काळात जन्म घेत आहात हे भाग्याचे आहे, असे मी त्यांना सांगितले होते.©️

हे सर्व सर्व मला गेल्या महिनाभरात आठवत होते. जसं जसं आजचा दिवस जवळ येत गेला तसे लक्षात आले की, म्हणूनच अत्यंत वैयक्तिक पातळीवर मी या सगळ्यांशी जोडले गेले आहे.©️

आम्ही कृतज्ञ कृतज्ञ कृतज्ञ आहोत
पाचशे वर्ष एखादा सतत संघर्ष जिवंत ठेवणे, त्यावर अटल राहणे हे निश्चितच सोपे नव्हते. पण आज जेव्हा आसेतू हिमाचल आणि भारताबाहेर जगभरातही अत्यंत उत्साहाने २२ जनेवरीची तयारी केली जात आहे, वाट पाहिली जात आहे, गणपती दिवाळी या सणांना मागे टाकेल, असा हा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे तेव्हा ही आजची भावना म्हणूनच नेमकी काय हे मला कळत आहे. जो जो हिंदू, तो तो माझा बंधू हे आज सर्वत्र दिसत आहे. जात-पक्ष- धर्म यांच्या पलीकडे जात आज प्रत्येक जण सोहळ्यात सहभागी होत आहे.
हे सर्व सर्व त्या हजारो कार सेवकांमुळेच आहे. मोदीजी स्वतः ज्या वेळी रथयात्रा सुरू झाली त्याच्या आयोजन नियोजनात सहभागी होते. त्यामुळे त्यांच्यासाठी आजच्या दिवसाचे महत्त्व साहजिकच मोठे आहे. राम आणि शरद कोठारी बंधू यांचे हौतात्म्य जे पुढे राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे प्रेरणा स्त्रोत बनले त्यांच्यासह ज्यांनी ज्यांनी आपले प्राणाचेही मोल दिले, त्यांच्यासाठी आजचा दिवस सर्वोच्च न्यायाचा आहे.©️
१९९२ ला ऐन तरुण वयात माझे वडील आणि तसेच हजारो कारसेवक अयोध्येला गेले. त्या आधी शेकडो वर्ष हा लढा हिंदू साधू संतांनी सुरू ठेवला. या सर्वांनी जे केलं त्यात त्या वेळी माझ्या पिढीच योगदान अर्थात शून्य ! काहीच न कळण्याचं आमचं वय.. माझे वडील कदाचीत परत आले नसते, तरीही तेव्हा काही कळलं नसतंच. पण तरीही हे सर्व जण एका विशिष्ट ध्येयासाठी आलो जिवंत तर नशीब मेलो तर रामासाठी या विचाराने गेले. देशाचा इतिहास बदलण्याची ताकद त्यांच्या त्या वेळच्या संघर्षात होती हे आज दिसून आलं आहे. हे सर्व अद्भुत आहे. तन मन धनाने स्वतःला अर्पित करणाऱ्या त्या प्रत्येक हिंदू योद्धा प्रती म्हणूनच आम्ही कृतज्ञ आहोत ! तुमच्यामुळे आमच्या पिढीला हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्याचे हे सौभाग्य मिळाले आहे. काल माझ्या मुलांना तुमच्यातही हिंदुत्वासाठी लढणाऱ्यांच रक्त आहे, हे जाणीवपूर्वक ऐकवताना मला अभिमान वाटत होता. ©️

राम-कृष्ण हे केवळ शब्द नाहीत तर ज्वाजल्य मंत्र©️
आजची राम मंदिर स्थापना हा हिंदूंच्या दुर्दम्य साहसी, विजिगीषू वृत्तीचा विजय आहे. हिंदूंनी एकजूट कायम ठेवली तर काय होऊ शकते, याचे हे उदाहरण आहे. निर्णयक्षम राजा असेल तर काय होऊ शकते याचंही हे उदाहरण आहे.©️ राम आणि कृष्ण, आमचे रामायण, महाभारत, भगवद्गीता हे केवळ कथा संग्रह नसून ते ज्वाजल्य मंत्र आहेत, ज्यांनी वेळोवेळी हिंदूंना प्रेरणाच दिली आहे, याचे हे राम मंदिर पुनर्निर्माण उदाहरण आहे आणि पुढील अनेक शतके हे राहणार आहे.
जसे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर ‘सुनत होती सबकी’ हे खर आहे, सशस्त्र क्रांतीचा पर्याय क्रांतिकारकानी निवडला नसता, तर देशाला स्वातंत्र्य लवकर मिळाले नसते हेच सत्य आहे, तसेच पाचशे वर्षापूर्वी जे जे झाले, १९९२ ला जे झाले, ते झाले नसते, तर आज आपण हा आनंदोत्सव आपण साजरा करू शकलो नसतो. आज अनेक देश भारताला शुभेच्छा देत आहेत, यथाशक्ती या सोहळ्यात सहभागी होत आहेत, हे सर्व दुनिया झुकती हैं झुकानेवाला चाहिए याच जिवंत उदाहरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आणि भारताच्या भाग्याने आमच्या समोर आहे.

भारताच्या, आध्यात्मिक, सांस्कृतिक पुनरुज्जीवनाला पर्याय नाही
हाच राष्ट्र आणि धर्मकारणे संघर्षरत
राहण्याचा वारसा आमच्या पिढीला पुढे न्यायचा आहे. आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्याविषयी अभिमान वाटावा, असे कार्य यथाशक्ती आम्हालाही करायचे आहे. हे असे क्षण भारताच्या सामाजिक, राष्ट्रीय जीवनात वारंवार आणायचे असतील तर भारताच्या, आध्यात्मिक, सांस्कृतिक पुनरुज्जीवनाला पर्याय नाही ही खूणगाठ या निमित्ताने आम्हाला आमच्याच मनाशी पुन्हा एकदा बांधायची आहे. आज जसं मागची पिढी आम्हाला सांगू शकते की आम्ही तुम्हाला राम मंदिराचा मार्ग मोकळा करून दिला, तसंच येणाऱ्या पिढ्यांनी जर आम्हाला विचारलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं ? तर त्याचेही उत्तर असेच अभिमानाने देण्यासाठी आम्हालाही आता राम राज्यासाठी योगदान द्यायचे आहे.©️

भविष्याची दिशा सांगणारी ही घटना
शतकांनी प्रलंबित असणारा प्रश्न सुटणे, अखेर न्याय मिळणे ही घटना वाटते तितकी साधी नाही. ही भविष्याची दिशा सांगणारी घटना आहे. ही रामराज्याची नांदी आहे. भारत सर्वार्थाने पुन्हा एकदा वैभवशाली समृध्द सर्वार्थाने सुरक्षित जागतिक नेतृत्व होण्याची ही सुरुवात आहे. ©️ ही धर्माची भूमी आहे, ही कर्माची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे, ही त्यागाची भूमी आहे, इथल्या घराघरात धर्म आणि क्षात्र तेजाचे बीज आहे, जे वेळ पडताच भाला होऊन उभे राहत आले आहे. हे सर्व आम्हाला यापुढेही जपायचे आहे, हे वृद्धिंगत करायचे आहे.©️

पहली बार महसूस हुआ है देश हिंदुओंका है
काल आम्ही भगवे ध्वज आणायला गेलो, तेव्हा दुकानात लागलेल्या रांगा मनाला सुखावत होत्या, हातगाडी असो नाहीतर मोठे मॉल त्यावर लागलेला भगवा ध्वज मनाला आश्वस्त करत होता. कधी नव्हे ते भगवा ध्वज महाग झाला होता. मागणी होती पण पुरवठा संपला होता, हे सर्व भारावून टाकणार होत आणि ते पाहून सहज सुचून गेलं,
गली गली मे श्रीराम हैं
गली गली मे छाया भगवा हैं ..
जिंदगी में पहली बार
महसूस हुआ है
देश हिंदुओंका है….🚩🚩🚩©️

शेवटी एकच, आजचा दिवस हा केवळ तात्कालिक event न बनता आजची ही भावना आम्हा प्रत्येकाच्या मनात प्रतिदिन राहावी, ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना आणि या अत्यंत दुर्मिळ ऐतिहासिक क्षणाच्या सर्वांना शुभेच्छा !©️

पधारो राम पूजा को
हृदय मंदिर सजाया हैं

जय श्रीराम 🚩🚩🚩
जय जय श्रीराम !🚩🚩🚩🚩🚩

– ©️वसुधा कुलकर्णी

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा