घर Politics सरकारने दडपण घेऊ नये म्हणून…

सरकारने दडपण घेऊ नये म्हणून…

21
0

प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केला ओबीसी आंदोलनाचा उद्देश

मुंबई: प्रतिनिधी

इतर मागासवर्गीय संवर्गात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केल्या जाणाऱ्या आंदोलनाचे दडपण घेऊन राज्य सरकारने विपरीत निर्णय घेऊ नये यासाठी इतर मागासवर्गीय समाज आझाद मैदानावर आणि प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल, असे प्रतिपादन प्रकाश शेंडगे यांनी केले आहे.

जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ३ कोटी मराठा आंदोलक १० लाख गाड्यांमधून मुंबईत येऊन आंदोलन करणार आहेत. इतक्या मोठ्या आंदोलनाचे दडपण सरकारवर येऊ शकते. ते येऊ नये यासाठी ओबीसी समाजही आझाद मैदानात आंदोलन करेल. त्याच प्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे, उपोषण अशा विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येईल, असे शेंडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मागासवर्गाचे निकष बदलण्याचा डाव 

सरकारने यापूर्वी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष बदलले. सदस्य बदलले. आता तर मागास वर्गाचे निकष बदलण्याचा डाव टाकला जात आहे, असा आरोप शेंडगे यांनी केला. इंद्रा सहानी खटल्याच्या कामकाजात सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गाचे ११ निकष निश्चित केले आहेत. ते बदलण्याचा अधिकार मागासवर्ग आयोगाला नाही आणि राज्य सरकारलाही नाही. ते बदलण्याचा प्रयत्न ही घटनेची पायमल्ली ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे 

जातनिहाय जनगणना ही इतर मागासवर्गीय समाजाची आग्रही मागणी आहे. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही आणि मराठा समाजाला जितका निधी दिला जातो तितका निधी इतर मागासवर्गाला मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही शेंडगे यांनी दिला.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा