घर Politics ‘विरोधक एकत्र यावे अशी इच्छा असली तरीही ते प्रत्यक्षात उतरणे कठीण’

‘विरोधक एकत्र यावे अशी इच्छा असली तरीही ते प्रत्यक्षात उतरणे कठीण’

22
0

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती

मुंबई: प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबद्दल शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही अनुकूलता दर्शवली असली तरीही खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीच, विरोधक एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा असली तरीही प्रत्यक्षात ते एकत्र येऊन निवडणुका लढवतील ही शक्यता कमी वाटते, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे. विरोधकांची प्रबळ एकजूट न झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही त्यांनी मांडली.

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असा दावा काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आता खुद्द महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेण्याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सूचना केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याबाबत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे पक्ष अनुकूल असल्याचे दिसून आले आहे. तरीही एकुणात विरोधकांच्या एकजुटी बाबत खुद्द आंबेडकर यांनाच शंका असल्याचे त्यांच्या विधानावरून दिसून येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना रोखण्यासाठी सर्व समविचारी विरोधक एकत्र येणे हे आवश्यक आहे. विरोधकांच्या आघाडीसाठी आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही राज्य महत्त्वाची आहेत. उर्वरित राज्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी फारसे काही करू शकत नसली तरीही महाराष्ट्रात आम्ही आपला प्रभाव दाखवू शकतो. विरोधक एकत्र येऊ शकले नाहीत तर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा पूर्ण ताकदीने लढवेल, असा दावा आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा