घर India नवीन वर्षापासून देवस्थानात काटेकोरपणे लागू होणार ड्रेस कोड

नवीन वर्षापासून देवस्थानात काटेकोरपणे लागू होणार ड्रेस कोड

21
0

पणजी: प्रतिनिधी

पर्यटनासाठी, विशेषत: सरत्या वर्षाला निरोप देताना किंवा नव्या वर्षाचे स्वागत करताना गोव्याला जाण्यास अनेकांची पसंती असते. गोव्यातील समुद्र किनारे हॉटेल्स आणि केसिनो हे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक चर्चेसही पर्यटकांचे आकर्षण आहेत. मात्र, मौजमजेचा मूड असल्यामुळे अनेकदा औपचारिक शिष्टाचाराचा विसर पडतो. किमान धार्मिक सरांना भेट देताना ही जाणीव कायम राहावी यासाठी देवस्थानाच्या व्यवस्थापनांनी काहीही शिस्तशीर पावले उचलत मंदिरांमध्ये येताना ड्रेस कोड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

देवस्थान ही फॅशन दाखविण्याची जागा नाही. तरीही अनेकदा पर्यटकांना याचे भान राहत नाही. काही पर्यटक लहान कपडे घालून देवस्थानात येत असतात. देवस्थानचे पावित्र्य कायम राखण्यासाठी मंदिरात येताना शॉर्टस, मिनी स्कर्ट्स, स्लीवलेस टॉप, आखूड आकाराचे टॉप्स, लो राईज जीन्स, टी शर्ट असे कपडे घालून येण्यास व्यवस्थापनाने प्रतिबंध केला आहे. हे निर्बंध एक जानेवारीपासून लागू असणार आहेत.

गोव्यातील प्रसिद्ध श्री मंगेश देवस्थानातही नवीन वर्षापासून सभ्य पेहरावबाबत कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. आखूड कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अनावधानाने किंवा माहिती अभावी असा पोशाख धारण करून आलेल्या भाविकांना पूर्ण अवयव झाकणारे वस्त्र देवस्थानच्या वतीने देण्यात येणार आहे. ते परिधान करूनच मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी दिली जाणार आहे.

देवस्थानाच्या या निर्बंधापासून १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सूट देण्यात येणार आहे. मात्र, १० वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्वांना हे निर्बंध काटेकोरपणे लागू असतील, असे देवस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारचे निर्बंध देवस्थानच्या वतीने लागू करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली गेली नव्हती. यापुढील काळात मात्र, हे नियम काटेकोरपणे अमलात आणले जातील, असेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा