घर Maharashtra Special संभाव्य मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तब्बल महिनाभर जमावबंदी

संभाव्य मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तब्बल महिनाभर जमावबंदी

19
0

मुंबई: प्रतिनिधी

मुंबईत आजपासून जवळ जवळ तब्बल महिनाभर, अर्थात १८ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी दिलेली कालमर्यादा पाळणे शक्य नसल्याने होणारी संभाव्य आंदोलने लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात केली आहे. मात्र, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करताना सरकारने २४ डिसेंबर पूर्वी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवरून स्पष्ट होत आहे.

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेली नवी कालमर्यादा नाकारली आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासाठी विशेष अधिवेशनाची आवश्यकता नाही. मिळालेल्या कुणबी नोंदी आणि नोंदी मिळालेल्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना आरक्षण देण्याचे निकष याबाबत आदेश जारी करून जुन्या कालमर्यादेत २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण लागू करण्यात यावे, अशी जरांगे पाटील यांची मागणी असून ती मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनात उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईत मराठा आरक्षण मोर्चाचे आयोजन करण्यात येत असून या मोर्चात राज्यभरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन समाजमाध्यमातून करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या मोर्चाला प्रतिबंध करण्यासाठी मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हा आदेश झुगारून मोर्चा अथवा अन्य प्रकारच्या आंदोलनाचे आयोजन केले गेले तर निर्माण होऊ शकेल अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई पोलिसांचे नियोजन सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा