घर Politics देशात लवकरच वाजणार लोकसभा निवडणुकीचे बिगुल: चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

देशात लवकरच वाजणार लोकसभा निवडणुकीचे बिगुल: चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

27
0

नागपूर: प्रतिनिधी

हिंदी भाषिक पट्ट्यातील तीन राज्यात मिळविलेल्या उल्लेखनीय यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असून त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सज्ज राहावे, असे स्पष्ट संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप आमदारांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलताना बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यास केवळ ५५ दिवसांचा कालावधी राहिला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभानंतर लगेचच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात येईल, असे आमदारांना सांगितले.

अल्पावधीत होऊ घातलेल्या या निवडणुकीच्या तयारीसाठी आमदारांनी सज्ज राहावे. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दि २५ जानेवारीपर्यंतच्या कालावधीत ५० लाख नमो ॲप डाऊनलोड करण्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक आमदाराने रोज किमान पाच मिनिट या ॲपचा वापर करावा, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

… तर राष्ट्रीय अध्यक्षांकडे जाईल नावांची यादी

या महत्त्वपूर्ण बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या आमदारांना राज्याच्या पक्षनेतृत्वाकडून तंबी देण्यात आली आहे. पक्षाच्या बैठकींना वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या नावांची यादी राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवून योग्य कारवाईची शिफारस करण्यात येईल, असा इशारा पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या बैठकीत दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा