घर IndiaAll सायबर गुन्ह्यांसाठी बदनाम जामतारा टाकत आहे कात,युवकांच्या पुढाकाराला प्रशासनाची साथ

सायबर गुन्ह्यांसाठी बदनाम जामतारा टाकत आहे कात,युवकांच्या पुढाकाराला प्रशासनाची साथ

32
0

रांची: प्रतिनिधी

आत्ता आत्तापर्यंत सायबर गुन्हेगारीचे केंद्र म्हणून बदनाम असलेल्या जामतारा परिसरात युवकांनी घेतलेला पुढाकार आणि त्याला मिळालेली प्रशासनाची साथ यामुळे विधायक वारे वाहू लागले आहेत. सायबर फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध असलेला हा भाग आता भाजीपाल्याच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनू लागला आहे.
दुष्काळ, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव यामुळे जाणतारा परिसरातील तरुण सायबर फसवणुकीतून सहजपणे मिळू शकणाऱ्या मोठ्या रकमांच्या विळख्यात अडकले. या परिसरातील अनेक गावेच्या गावे सायबर गुन्हेगारीचे संघटित रॅकेट चालवत असत. देशात कुठेही घडलेल्या सायबर फसवणुकीची तार जाणतारा पर्यंत येऊन पोहोचत असे. सध्याच्या काळात मात्र हा परिसर कात टाकू पहात आहे.
युवकांना गुन्हेगारी पासून दूर करण्यासाठी केवळ कायद्याचा बडगा उपयोगी नाही हे लक्षात घेऊन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काही विधायक उपक्रम हाती घेतले. सायबर गुन्हेगारी विरोधी जनजागृती करण्यासाठी ‘पुलिस की पाठशाला’ हा उपक्रम प्रभावी ठरला. या परिसरातील शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हा परिसर बदलू लागला.
पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने तब्बल 118 ग्रामपंचायतींमध्ये वाचनालय सुविधा सुरू करण्यात आली. ही वाचनालये केवळ वाचनालये न राहता प्रबोधनाची केंद्रबंदी आहेत. पोलीस आणि जिल्हा प्रशासन अधिकारी या ठिकाणी विशेषता युवकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करत आहेत.
या दुष्काळी आणि उद्योगधंद्यांचा अभाव असलेल्या परिसराचा आर्थिक विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रामुख्याने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विंधन विहिरी, कुपनलिका उपलब्ध करून देण्यात आले. सायबर फसवणुकीतून मिळणाऱ्या सहज आणि जलद पैशाला चढवलेल्या गावकऱ्यांकडून सुरुवातीला फार प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, डोक्यावर सतत टांगती तलवार घेऊन जगायला कंटाळलेल्या काही स्थानिक युवकांनी शेतीची कास धरली. उपलब्ध पाणी आणि कृषी विभागाची साथ यामुळे त्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अन्य ग्रामस्थांनीही कंबर कसली. आता हा परिसर भाजीपाला विशेषत: दुधी भोपळा आणि कारली यांच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनू पाहत आहे. स्थानिक नागरिक विशेषतः युवक आणि प्रशासन यांनी हातात हात घालून घडवलेला कायापालट हा पथदर्शीद ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा