इम्फाळ: वृत्तसंस्था
येथील विमानतळाच्या वर असलेल्या आकाशात रविवारी दुपारी एक अज्ञात तरंगणारी वस्तू आढळून आली. अर्थातच याबाबत भारतीय हवाई दलाला त्वरित माहिती कळविण्यात आली. त्यानुसार या वस्तूचा शोध घेण्यासाठी दोन राफेल ही लढाऊ विमानेही रवाना करण्यात आली. मात्र तोपर्यंत ही तरंगती वस्तू दिसेनाशी झाली, असे लढाऊ विमानांना आढळून आले.
रविवारी दुपारच्या वेळी इंफाळच्या वीर टिकेन्द्रजीत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वर असलेल्या आकाशात एक अनाकलनीय वस्तू तरंगत असल्याचे आढळून आले. ही वस्तु साध्या डोळ्यांनी ही स्पष्टपणे दिसून येत होती. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून या काळात विमानतळावरून होणारी काही विमानांची उड्डाणे स्थगित करण्यात आली.
या अनोळखी तरंगत्या वस्तूबाबत हवाई दलाला माहिती देण्यात आली. हवाई दलाच्या जवळच्या तळावरून या वस्तूचा शोध घेण्यासाठी आधी एक राफेल लढाऊ विमान रवाना करण्यात आले. या विमानाला कोणतीही तरंगती वस्तू आढळून आली नाही. पहिले विमान तळावर परत आल्यावर आणखी एक विमान पाहणी करण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र या विमानालाही कोणतीही तरंगती वस्तू आढळून आली नाही. दुपारी चारच्या सुमारास ही वस्तू दिसेनाशी झाल्याचे विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. हवाई दलाने यादरम्यानच्या काळात हवाई सुरक्षेची काळजी घेणारी यंत्रणाही त्वरेने कार्यान्वित केली. मात्र, ही यंत्रणा ही या अनोळखी वस्तूचा शोध घेऊ शकली नाही.