मुंबई: प्रतिनिधी
मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती, त्यासाठी सांगितले जाणारे आजारपणाचे कारण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दिल्ली वारी यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना ऊत आहे. या संधीचा फायदा घेऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांचे आजारपण राजकीय असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार अनुपस्थित होते. त्यानंतर त्यांच्याच निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीतही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांना घशाच्या आजाराचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हे त्यांच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार यांच्याबरोबर महायुतीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील धुसफूस हे अजित पवार यांच्या अनुपस्थितीचे खरे कारण असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.
महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदाचे वाटप हा विषय नेहमीच चर्चेचा राहिला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीत अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये अधिक भर पडली. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री पद देण्याबाबत युतीमध्ये वाद असल्याचा विरोधकांचा दावा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तो फेटाळून लावला आहे. ही संधी साधून अजित पवार यांचे आजारपण राजकीय असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तर मधुचंद्राचा काळ संपण्यापूर्वीच महायुती धुसफुस सुरू झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
कालची मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर तातडीने शिंदे आणि फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे गटातील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत होणारी सुनावणी, त्यानंतरचे संभाव्य परिणाम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे, याबाबत निवडणूक आयोगासमोर होऊ घातलेली सुनावणी आणि जातीनिहाय जनगणना अशा विषयांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.