घर Pune शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्या: साहित्य क्षेत्राकडून आग्रही मागणी

शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्या: साहित्य क्षेत्राकडून आग्रही मागणी

43
0

पुणे : प्रतिनिधी

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नव्याने निवड करताना विख्यात साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना संधी द्यावी, या मागणीने साहित्य क्षेत्रात जोर धरला आहे. राज्यातील नामांकित साहित्यिकांसह साहित्यिक चळवळीत काम करणाऱ्या २० हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

साहित्य, कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावे, त्या त्या क्षेत्रातील प्रतिनिधींनी त्यांचे प्रश्न आणि समस्या सत्ताधाऱ्यांसमोर मांडाव्यात यासाठी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड होत असते. या सदस्यांच्या नावाची शिफारस सरकार राज्यपालांकडे करत असते.

साहित्य क्षेत्रातून सुप्रसिध्द साहित्यिक व शरद गोरे यांना संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे तसेच राजकीय पुनर्वसन म्हणून कुणाचीही वर्णी लावू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याप्रमाणेच तब्बल वीस हजाराहून अधिक जणांनी आपल्या मागणीचे निवेदन हजारो स्वाक्षऱ्यांसह राज्यपाल, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केले आहे. एखाद्या साहित्यिकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनाधार प्राप्त होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असणार आहे.

शरद गोरे यांनी सन १९९३ साली अखिल भारतीय साहित्य परिषदेची स्थापना केली. साहित्य परिषदेचे महाराष्ट्र सह देशाच्या इतर मराठी भाषिक प्रांतातही सभासद असून आजवर संस्थेने १५० हून अधिक साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रासह महाराष्ट्र बाहेर देखील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संमेलने घेतलेली आहेत.

नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, बेळगाव मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी आदी संमेलनांचा यामध्ये समावेश आहे.

गोरे यांनी आतापर्यंत एकूण १० ग्रंथाचे लेखन  केलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य भाषांतरित केला आहे. यामुळे बुधभूषणकार अशी त्यांची ख्याती आहे. युगंधर प्रकाशन या संस्थेचे ते संपादक व प्रकाशक आहेत.  या संस्थेने आजवर १४४ दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत.

त्यांनी लेखक, दिग्दर्शक व संगीतकार म्हणून पाच चित्रपट व एक नाटक केले आहे. ज्यामध्ये रणांगण एक संघर्ष, उषःकाल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास, सूर्या ऐतवी, फुल टू हंगामा आदी चित्रपटांचा समावेश आहे. उत्तम शिवव्याखाते म्हणून ते महाराष्ट्रास परिचित आहेत. आजवर विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात अशी भरीव कामगिरी करणाऱ्या गोरे यांना या क्षेत्राच्या प्रगतीसाठी विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा