घर Politics महिला आरक्षण विधेयक देशभर लागू करा: सोनिया गांधी यांची मागणी

महिला आरक्षण विधेयक देशभर लागू करा: सोनिया गांधी यांची मागणी

31
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

महिलांना आपले राजकीय हक्क प्राप्त करण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली असून ही बाब अयोग्य आहे. त्यामुळे महिला आरक्षणाची देशभर त्वरित अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलताना केली.

भारतीय महिलांनी दीर्घ काळापासून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकारण आणि समाजकारणात कार्यरत असलेल्या महिलांची उदाहरणे देऊन महिलांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे. त्यामुळे महिलांना अधिकाधिक प्रमाणात निर्णय प्रक्रियेत सामावून घेऊन त्यांना त्यांचे राजकीय हक्क प्रदान करणे आवश्यक आहे, असे मत गांधी यांनी व्यक्त केले.

महिलांचा राजकारणातील सहभाग वाढविणे हे आपले पती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रथम विधेयक मांडले. मात्र काही मतांनी ते मंजूर होऊ शकले नाही. पुढे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात ते मंजूर झाले. आता त्यापुढे पाऊल उचलणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.

विधेयकावरून फुटले श्रेयवादाला तोंड

महिलांच्या राजकीय आरक्षणाचे विधेयक संसदेत सादर होताच काँग्रेसच्या काही नेत्यांनी महिलांना राजकीय आरक्षण देणे हे काँग्रेसचे धोरण असल्याचे नमूद केले. सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात हा दावा अधोरेखित केला आहे असे समजून सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही त्याचा प्रतिवाद करण्यास सुरुवात केली आहे. संसदेत सादर करण्यात आलेले महिला आरक्षण विधेयक हे भाजपचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे, असा दावा करण्यास सत्ताधारी नेत्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे या विधेयकावरून श्रेयवादाला तोंड फुटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा