घर Pimpri-Chinchwad टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पण

टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पण

32
0
सुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल – सुनील कुमार तिवारी

पिंपरी, प्रतिनिधी – टाटा मोटर्स पिंपरी यांच्या वतीने खेड तालुक्यातील शिवे गावात ज्ञानदीप माध्यमिक शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा बांधण्यात आली. या प्रयोगशाळेचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 8) करण्यात आले. शाळेच्या इमारतीपासून प्रयोगशाळा आणि अन्य सुविधा टाटा मोटर्सच्या वतीने उभारण्यात आल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी टाटा मोटर्स कायम प्रयत्नशील असून शिवे गावातील शेकडो विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.

प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी टाटा मोटर्सचे पिंपरी प्लांट हेड सुनील कुमार तिवारी, एच आर हेड प्रणव कुमार, फायनान्स हेड अरींदम दास, सिनियर जीएम उमेश तांबोलकर, विश्वेश देव्हारे, विजयकुमार सिंग, संजीव काळे, नितीन कळमकर, नितीन काशीद, राकेश पांडे, पवन त्रिवेदी, सुरेंद्र कुलकर्णी, उमेश मंगलोरे, अदील बाला, रोहित सरोज, शाळेचे पदाधिकारी विनायक शिवेकर, नंदकुमार शिवेकर, धनंजय भांडवलकर, दत्तात्रय शिवेकर, दत्तात्रय अडवळे, कालुदास सातपुते, शांताराम खुटवळ, नामदेव गडदे, रोहिदास गडदे, शांताराम सातपुते, शंकर साळुंखे, दत्तात्रय शिवेकर, अरुण साळुंखे, दादाभाऊ शिवेकर, शांताराम गिधे, शांताराम भालसिंग, मनोहर शिवेकर आदी उपस्थित होते.

सुनील कुमार तिवारी म्हणाले, ग्रामस्थांच्या प्रयत्नांना टाटा मोटर्सने केवळ बळ दिले आणि गावात अनेक चांगल्या सुविधा निर्माण झाल्या. हे टाटा मोटर्स सह ग्रामस्थांचेही यश आहे. इथले विद्यार्थी अतिशय चिकित्सक आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बरोबर संस्कृती आणि विचार काय देतो हे देखील महत्वाचे आहे. सुसज्ज प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होईल, असेही ते म्हणाले.

टाटा मोटर्सचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी दरवर्षी मार्च व सप्टेंबर महिन्यात जमशेदजी टाटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक उपक्रम राबवितात. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य समाजातील विविध घटकांसोबत वेळ घालवून वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर उपक्रम राबवितात. आपल्याकडे असलेली कौशल्ये गरजू लोकांना देण्याचा याध्यामातून प्रयत्न केला जातो. सप्टेंबर 2023 मध्ये या उपक्रमाचे 20वे चरण सुरू झाले. याचा शुभारंभ देखील शिवे येथील कार्यक्रमातून करण्यात आला. टाटा मोटर्स मधील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी गटचर्चा करून त्यांच्याकडील कौशल्य विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

सन 1992 साली टाटा मोटर्सने शिवे गावात ज्ञानदीप विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करून दिले. त्यानंतर सातत्याने टाटा मोटर्सने शिवे गावात आरोग्य शिबिरे, चारसुत्री भात शेती, निर्धुर चुली, सामुदायिक विवाह सोहळा, मागेल त्याला शौचालय असे अनेक उपक्रम राबविले. शिवे गावातील माध्यमिक शाळेत पंचक्रोशीतील 173 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अद्ययावत प्रयोगशाळेची आवश्यकता होती. ही बाब टाटा मोटर्सच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर तात्काळ अंमलबजावणी करत प्रयोगशाळा तयार करण्यात आली. आजवर केवळ एका कपाटात असलेली प्रयोगशाळा आता प्रशस्त हॉल मध्ये सुरू झाली आहे. यामध्ये सुमारे 70 प्रयोग मांडण्यात आले असून प्रयोगशाळेचे साहित्य मांडण्यासाठी खास सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

वैज्ञानिक प्रयोगशाळा लोकार्पणाचा कार्यक्रम असल्याने शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी हृदय, वृक्क, उत्सर्जन संस्था, प्रकाश संश्लेशण, मूलदाब, केंद्रक, स्पायरोगायरा, प्रकाशवर्ती प्रतिसाद, विद्युतघट, बायोगॅस, चेतापेशी, अमिबा, गुणसूत्र रचना, फुलांचे अंतरंग अशा वैज्ञानिक प्रयोगाच्या रांगोळ्या काढल्या. त्याची उपस्थितांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांनी रांगोळ्यांबाबत माहिती दिली.

प्रयोगशाळेचे उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले. काहीजण वैज्ञानिक प्रयोग करून जादूटोणा केल्याचे भासवतात. अशा लोकांना बळी पडू नये  यासाठी विद्यार्थ्यांनी कॅल्शियम कॉर्बाइट आणि पाण्याचा वापर करून दिवा पेटवून विद्यार्थ्यांनी उपस्थितांना आश्चर्यचकित केले.

शहरी भागात चांगल्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधा असतात. पण ग्रामीण भागातील विद्यार्थी या सुविधांपासून वंचित असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळे येतात. त्यामुळे टाटा मोटर्सने पुढाकार घेऊन शाळा बांधली आणि आता अद्ययावत प्रयोगशाळा देखील बांधण्यात आली.

पूर्वी गावात सातवी पर्यंत शाळा उपलब्ध होती. पुढील शिक्षणाची सुविधा नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शिक्षण गळती झाली. टाटा कंपनीने शाळा बांधून दिली आणि चांगल्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. आजवर शाळेतील दीड हजार विद्यार्थी शाळेतून पास आऊट होऊन समाजात चांगले काम करीत आहेत. हे केवळ टाटा मोटर्स मुळे शक्य झाले आहे. गावातील अनेक कामे टाटा मोटर्सच्या वतीने करण्यात आली. शैक्षणिक संसाधनांसह क्रीडा स्पर्धांचे व्यासपीठ देखील उपलब्ध करून देण्यात आले. तसेच सांस्कृतिक व्यासपीठ देखील टाटा कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. टाटा मोटर्स कंपनीबद्दल प्रेमच नाही तर खूप आदर वाटतो, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

टाटा मोटर्स सहकारी पतसंस्थेच्या वतीने संगणक कक्ष उभारण्यात येणार आहे. याची घोषणा यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा