घर India कुठलाही पुरस्कार शक्ती, ताकद, उर्जा देऊन जातो – पं. नंदकिशोर कपोते

कुठलाही पुरस्कार शक्ती, ताकद, उर्जा देऊन जातो – पं. नंदकिशोर कपोते

62
0

“मी पं. बिरजू महाराजजींकडून गुरुशिष्य परंपरेनुसार नृत्याचे धडे घेतले. महाराजजींची लखनौ घराण्याची नृत्यशैली आत्मसात करत असताना ते म्हणाले, ‘नंदू, जबतक तुम्हारे पैरों में घुंगरु हैं, तबतक मैं तुम्हारे साथ हू.’ त्यांच्या या शब्दांची साथ आजवर आहे आणि मी त्यानुसारच वाटचाल करत आहे. कुठलाही पुरस्कार शक्ती, ताकद, उर्जा देऊन जातो. आणि हा तर मला माझ्या शहरात मिळालेला पुरस्कार आहे त्यामुळे त्याचे महत्व आणखी आहे “, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांनी व्यक्त केले.

यंदा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने डॉ. नंदकिशोर कपोते यांना यंदाचा स्वरसागर पुरस्कार खा. श्रीरंगआप्पा बारणे, आ. उमा खापरे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत  प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वरसागर महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे, युवा गायिका सावनी रवींद्र, पिंपरी चिंचवड सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल गालिंदे, विजय भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. पं. बिरजू महाराजांचे पट्टशिष्य आणि नृत्यात डॉक्टरेट मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना प्रदान करण्यात आलेल्या स्वरसागर पुरस्काराचे मानपत्र, शाल आणि पंचवीस हजार रुपयांचा धनादेश असे  स्वरुप आहे. या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन रौप्यमहोत्सवी स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

तसेच ‘बार्डो’ या चित्रपटातील ‘रान पेटले’ या चित्रपट गीताला यंदाचा पार्श्वगायनाचा  राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल या गीताची गायिका सावनी रवींद्र हिचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याशिवाय पं. पद्माकर कुलकर्णी स्मृती पुरस्कार युवा गायक ऋतुराज कोळपे याला प्रदान करण्यात आला.

यावेळी खा. श्रीरंग बारणे म्हणाले, ‘गेली पंचवीस वर्षे या नगरीत स्वरसागर महोत्सव सुरु आहे. देशभरातील नामवंत कलाकार येथे येऊन आपली कला सादर करुन गेले आहेत. येथे देण्यात येणारा हा पुरस्कार फक्त साधा पुरस्कार नसून या पिंपरी चिंचवड नगरीतील नागरिकांचे प्रेम आहे’.

आ. उमा खापरे म्हणाल्या, ‘मागील पंचवीस वर्षे सुरु असलेल्या या महोत्सवाची मी सुरुवातीपासूनची साक्षीदार आहे. हे सगळे कलाकार म्हणजे मोती आहेत आणि त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी खूप उत्तम प्रकारे केले आहे. त्यामुळे रसिकांना उत्तम कार्यक्रम अनुभवता येतात’.

प्रशासक शेखर सिंह यांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी केले. मानपत्राचे वाचन तेजश्री अडीगे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन सुरेखा कुलकर्णी यांनी केले. आभार श्रेयस आवटे यांनी मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा