घर Pune बांबू ही मानवासाठी सोन्याची काठी: डॉ हेमंत बेडेकर

बांबू ही मानवासाठी सोन्याची काठी: डॉ हेमंत बेडेकर

68
0

पुणे: प्रतिनिधी

‘जीविधा’ संस्था आयोजित १३ व्या हिरवाई महोत्सवास आज(३ ऑगस्ट २०२३) रोजी  उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ‘शाश्वत विकासासाठी बांबू :बांबूची अनोखी दुनिया’ या विषयावर अभ्यासक, बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. हेमंत बेडेकर यांचे व्याख्यान झाले.

डॉ. हेमंत बेडेकर म्हणाले, ‘बांबू हा गवताचा प्रकार आहे. भारतात आता जम्मूसह सर्वत्र बांबूची लागवड होते. बांबू हा मनुष्यजातीसाठी जीवनाधार आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत तो मानवजातीला उपयुक्त ठरतो. हिरोशिमा अणुस्फोटानंतर सर्व संपले असे वाटत असताना प्रथम उगवलेला कोंब हा बांबूचा होता. जमिनीची धूप थांबवतो, निलगिरीपेक्षा दुप्पट वेगाने त्याची वाढ होते. ८० दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार देण्याची क्षमता बांबूत आहे. बांबू हे हिरवे सोने, म्हणजेच सोन्याची काठी म्हटले जाते. आता घरे, मॉल देखील बांबूच्या वापराने उभे राहू शकतात. ऊसाप्रमाणे वाढणारे पण हे कोरडवाहू असे नगदी पीक आहे. गृहनिर्मिती पासून औद्योगिक वापरापर्यंत बांबू उपयोगी आहे. किमान ४० वर्ष उत्पन्न देते. सह्याद्रीत मोठया लागवडीच्या क्षमता आहेत. जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत भारताने बांबू लागवड मनावर घेण्याची गरज आहे. हेक्टरी २० टन, ४० टन बांबू उत्पन्न घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांनी स्वीकारायला पाहिजे, ‘असे डॉ. बेडेकर यांनी सांगितले.

या महोत्सवांतर्गत दि ३ ते ५ ऑगस्ट २०२३ दरम्यान रोज  सायंकाळी ६.३० वाजता पर्यावरणविषयक विविध व्याख्यानांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, पुणे मनपा राजेंद्रनगर, सचिन तेंडुलकर जाॅगिंग पार्क समोर, म्हात्रे पुलाजवळ हा महोत्सव होत आहे. देशी वनस्पतींच्या लागवडीच्या कामात सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढावा यासाठी गेली १२ वर्षे हा उपक्रम जीविधा संस्था आयोजित करते.

या वर्षीच्या हिरवाई महोत्सवातून ‘बांबू’ या वनस्पतीच्या माहिती आणि जनजागृतीवर भर दिला जात आहे. बांबूचा औद्योगिक वापर, त्याचे आर्थिक गणित आणि देशात बांबू क्रांती आणण्यासाठीचे उपाय यावर प्रकाश टाकणारी दोन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

जीविधा चे संस्थापक राजीव पंडित यांनी महोत्सवाच्या पहिल्या सत्राचे प्रास्ताविक केले. वृंदा पंडित यांनी स्वागत केले. शुक्रवार, ४ ऑगस्ट २०२३ रोजी’ बांबू आणि पर्यावरण’ या विषयावर डॉ. हेमंत बेडेकर मार्गदर्शन करणार आहेत. बांबूचे पर्यावरणातील स्थान, पाऊस,वारा, माती आणि पाणी संवर्धन, बांबू आणि पाणी शुद्धीकरण,  बांबू उद्यान आणि आपले स्वास्थ्य, बांबू आणि प्राणवायू, नदीकाठ आणि बांबू  या विषयाची चर्चा होणार आहे .

राजीव पंडित म्हणाले, ‘ मोठया वाढणाऱ्या झाडांच्या लागवडीप्रमाणे गवताळ राने जपण्याचीही गरज आहे. गवताप्रमाणे बांबू लागवडीकडेही लक्ष द्यायला हवे. ‘

या महोत्सवाची सांगता दरवर्षी प्रमाणे महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे.शनिवार , दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी महाकवी कालिदास रचित कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज अनुवादित ‘संगीत मेघदूत’ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

संहिता लेखन डॉ.मंदार दातार यांचे असून  संगीत  अमोल अशोक काळे यांचे आहे.  अमोल काळे व स्वामिनी कुलकर्णी  (गायन ) , महेश कुलकर्णी( तबला )   ,  रुद्र जोगळेकर ( तबला, डफ, घटम, खंजिरी ), ओवी काळे, मोहिनी कुलकर्णी ( तालवाद्य ), गौरव बर्वे (यक्ष वाचन ),स्वामिनी कुलकर्णी ( सिंथेसायझर ) हे साथसंगत करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा