नवी दिल्ली: प्रतिनिधी
प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर तपास यंत्रणांच्या चौकशीतून निर्दोष ठरली आणि तिला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले तर रिपब्लिकन पक्ष आठवले गट तिला राजकारणाच्या मैदानात उतरविण्यास उत्सुक आहे. उत्तर प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षपदावर तिची नेमणूक केली जाईल, असे संकेत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी दिले आहेत.
पब्जीच्या खेळातून सचिन मीना याच्याशी झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यामुळे सीमा पाकिस्तानातून नेपाळ मार्गे भारतात ग्रेटर नोएडा येथे आली आहे. ती पाकिस्तानी हेर असल्याचा संशय भारतीय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे तिची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप तरी ती हेर असल्याचे आणि तिचे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे लागेबांधे असल्याचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत.
दरम्यान, ही अनोखी प्रेमकहाणी आणि तिच्या भारतात येण्यामुळे निर्माण झालेले संशयाचे वलय यामुळे सीमा प्रसिद्धीच्याच झोतात मात्र आली आहे. सध्या तर तिला चक्क बॉलीवूड मधील एका चित्रपटात नायिकेची भूमिका दिली जाणार असून तिची स्क्रीन टेस्ट ही झाली असल्याच्या चर्चा जोरात आहेत. तिच्याबरोबरच तिचा पती सचिन मीना यालाही चित्रपटात काम मिळणार असल्याची चर्चा आहे.
त्यातच आता सीमा हिला राजकारणाच्या रिंगणात उतरवण्याची तयारी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. सीमावर असलेले हेरगिरीच्या संशयाचे सावट दूर झाले आणि तिला भरतात नागरिक म्हणून मान्यता मिळाली तर तिला आपल्या पक्षात प्रवेश देऊन महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याची तयारी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने केली आहे. रिपब्लिकन पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असून रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी चौकशीचा ससेमिरा पूर्ण होऊन सीमा हैदरला भारतीय नागरिकत्व मिळाले आणि मतदार यादीत तिचे नाव समाविष्ट झाले तर पक्षाकडून तिला निवडणूक लढविण्याची संधी दिली जाऊ शकते. पक्ष संघटनेत महत्त्वाचे पद देण्याची तयारी तर पक्षाने दर्शवलीच आहे. प्रामुख्याने तिचे वक्तृत्व उत्तम असल्याने पक्ष तिला राजकारणात आणण्यात उत्सुक आहे, असे मासूम यांनी स्पष्ट केले.