घर Uncategorized वैदिक संशोधन मंडळाचा स्थापना दिवस वृक्षारोपणाने साजरा

वैदिक संशोधन मंडळाचा स्थापना दिवस वृक्षारोपणाने साजरा

377
0

पुण: प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय(CSU), नवी दिल्ली कडून मान्यताप्राप्त अशी वैदिक संशोधन मंडळ ही पुण्यातील वेदविषयक संशोधन करणारी अग्रगण्य संस्था आहे. दि . १ ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेला ९५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात दि. १ ऑगस्ट १९२८ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यस्मरणार्थ संस्थेची स्थापना करताना लोकमान्यांच्या व्यक्तित्वाचे दोन विशेष पैलू लक्षात घेतले होते. लोकमान्य टिळक देशभक्त, पत्रकार, वक्ते होतेच पण याशिवाय उत्तम वेदाभ्यासक आणि भाषाभ्यासक होते. राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. हा पैलू जतन करण्याच्या हेतूने वेदाभ्यास आणि वेदविषयक संशोधनासाठी काही निश्चित ध्येयधोरणे ठरवून संस्थेचा प्रारंभ झाला.

वेदविषयक संहिता ग्रंथांचे भाष्यासह संपादन करून चिकित्सक आवृत्ती तयार करणे, वेदसंबंधी हस्तलिखितांचा संग्रह करणे, अभ्यासकांना संशोधनासाठी मदत करणे, प्रोत्साहन देणे हे संस्था स्थापनेचे उद्देश आहेत. याच ध्येयधोरणांसह संस्था आजवर वाटचाल करत असून संस्थेची प्रकाशने विश्वमान्य आहेत. संस्थेद्वारा प्रकाशित ऋग्वेदाची आवृत्ती संशोधनक्षेत्रात ‘Poona Edition’ या नावाने ओळखली जाते. १९६० पासून संस्थेची स्वतंत्र इमारत आहे. आज १ ऑगस्ट २०२३ नुकतीच ९५ वर्षे पूर्ण करून संस्थेने  शताब्दीच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे.

नुकताच जागतिक वृक्षारोपण दिन साजरा झाला. या निमित्ताने यावर्षी वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम सर्वांच्या सहकार्याने राबवण्यात आला. एकूण शंभर वृक्ष नव्याने लावण्यात आले असून त्यात शमी, पर्ण, उंबर, देवदारु, पिंपळ, जांभूळ, खैर, बिल्व-बेल अशा यज्ञीय वृक्षांबरोबरच चंदन, कांचन, बकुळ, पारिजात, अर्जुन, आवळा, आंबा अशा अनेक नक्षत्रवृक्षांचा समावेश आहे. तसेच तुळस, आघाडा, रुई अशा परिचित वनस्पतीही आहेत.

दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेच्या आवारातच पदाधिकारी डॉ. हेमा डोळे, संचालक डॉ. वि. सुब्रह्मण्य, उपस्थित मान्यवर, अतिथी आणि संस्थेचा सेवकवर्ग या सर्वांनी मिळून झाडे लावली.

मुख्य कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला हार घालून, पुष्पांजली अर्पण करून झाली. यानंतर संचालक डॉ. वि. सुब्रह्मण्य, वैदिक संशोधन मंडळाच्या समिती सदस्य डॉ. हेमा डोळे यांची थोडक्यात भाषणे झाली. यानंतर उत्साहाने वृक्षारोपणात सर्वांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा