घर Pune City ग्रुपिझमच्या काळात माणसे जोडण्यावर भर: वैभव जोशी

ग्रुपिझमच्या काळात माणसे जोडण्यावर भर: वैभव जोशी

34
0

पुणे : प्रतिनिधी

गझल-काव्याच्या प्रांतात ग्रुपीझम दिसून येत असताना पुरस्काराच्या निमित्ताने माणसे जोडण्याची दुर्मिळ गोष्ट घडत आहे. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा आदर्श संयोजक पुरस्कार हा फक्त पुरस्कार नसून माणुसकीचा प्रसार आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध गझलकार, कवी वैभव जोशी यांनी काढले.

सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे आदर्श संयोजक पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार मुबंईतील ब्रह्मकमळ समुहाचे संस्थापक विशाल राजगुरू यांना जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जोशी, राजगुरू यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर यावेळी व्यासपीठावर होते. शाल, ग्रंथ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

विशाल राजगुरू यांच्या कार्याचा गौवर करताना वैभव जोशी पुढे म्हणाले, कार्यक्रमाचे आयोजन करताना सर्वसमावेशक भूमिका घेऊन स्वत:मधील स्वाभीमान बाजूला ठेवावा लगातो. याची जाण असल्याने लेखणीतला विशाल आता वेगळा वाटतो आहे, गझलप्रांतात तो प्रगल्भ होत असल्याचे दिसून येत आहे. ते पुढे म्हणाले, रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मला भाऊसाहेब पाटणकर यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार अनेक पुरस्कारांचा पाया होता. त्यानंतर आयुष्यात आशीर्वादरूपी अनेक पुरस्कार मिळाले. ग्रुपीझमचा संदर्भ देऊन कवी-गझलकारांनी इतरांच्या कविता-गझल ऐकायला जावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

सत्काराला उत्तर देताना विशाल राजगुरू म्हणाले, कार्यक्रमांचे आयोजन करताना नवोदित-ज्येष्ठ कवी-गझलकारांना ऐकण्याची संधी मिळाली. खेडोपाडी गझल पोहोचवायची या उद्देशाने महाराष्ट्रातल्या 31 शहरांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यातून आपल्याला काय मिळेल याचा कधी विचार केला नाही. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मिळालेला पुरस्कार भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.

सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या तीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्र वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मराठी गझल मुशायरा आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रमोद खराडे, सूरज येलगुडे, वैभव कुलकर्णी, विजय उतेकर, आनंद पेंढारकर, सानिका दशसहस्त्र, सुनिती लिमये, आदेश कोळेकर यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन अमिता पेठे-पैठणकर यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा