घर Pune प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखा: वंदे मातरम संघटनेची मागणी

प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखा: वंदे मातरम संघटनेची मागणी

85
0

पुणे: प्रतिनिधी

राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षानंतर अनेक महाविद्यालये व्यवस्थापन कोटाच्या नावाखाली अनेक विद्यार्थ्यांकडून मोठ्या पैशांची मागणी करतात. अनेक धनदांडगे देखील आपल्या पाल्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी ही रक्कम भरतात. मात्र, गरजू विद्यार्थ्यांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने या यावेळी प्रवेश प्रक्रियांमध्ये अशा प्रकारचे होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शासनाच्या वतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे, विद्यार्थ्यांना विविध शासकीय व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश निश्चित केला जातो. मात्र, प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक महाविद्यालयात ‘व्यवस्थापन कोटा’ पुढे करून विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जातात. यामुळे अनेकदा गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास अडचण निर्माण होते.

व्यवस्थापन कोट्यामध्ये केवळ इमारत निधी/ देणगीच्या नावाखाली मोठी रक्कम पालक व विद्यार्थ्यांकडून उकलण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी देखील प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शासनाने प्रवेश प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, अन्यथा वंदे मातरम संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा  यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे यांच्या वतीने तंत्र शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक दत्तात्रय जाधव यांना देण्यात आला आहे.

अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशास अडचणी

यापूर्वी देखील व्यवस्थापन कोट्याच्या संदर्भात अनेक तक्रारी संघटनेकडे आल्या होत्या. प्रवेशासाठी उत्सुक असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना  व्यवस्थापन कोट्याच्या जाळ्यात अडकविण्यात येते. त्यानंतर विद्यार्थ्यांकडे व पालकांकडे मोठ्या रकमांची मागणी करण्यात येते. ती मागणी पूर्ण न केल्यास पाल्याचा प्रवेश नाकारण्यात येतो. यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच शासनाने या प्रकारात लक्ष घालावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तंत्रशिक्षण विभागाचे महासंचालक, सहसंचालक यांना देण्यात आले असल्याचे वंदे मातरम संघटनेचे पुणे शहर कार्याध्यक्ष आश्रू खवळे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा