घर Health प्राचीन आयुर्वेदाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हवी: वैद्य जुवेकर यांचे प्रतिपादन

प्राचीन आयुर्वेदाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हवी: वैद्य जुवेकर यांचे प्रतिपादन

52
0

पुणे : प्रतिनिधी

“समृद्ध अशा आयुर्वेदाच्या चिरंतर तत्वांना समजून घेत त्याचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करायला हवा. बदलत्या जीवनशैलीच्या काळात आयुर्वेदाला प्रभावी उपचारपद्धती म्हणून विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. केशायुर्वेद व कायायुर्वेद यांसारखे तंत्रज्ञानाधारित आयुर्वेद उपक्रम राबवावेत,” असे मत ज्येष्ठ वैद्य दिवाकर जुवेकर यांनी व्यक्त केले.

प्राचीन संहिता गुरुकुल, केशायुर्वेद व कायायुर्वेद या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिग्गजांच्या मुलाखती’ या विशेष कार्यक्रमात वैद्य जुवेकर व वैद्य अनंत धर्माधिकारी यांना ‘आचार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वैद्य स्नेहा कुलकर्णी यांनी ‘महाराष्ट्रातील जुन्या वैद्यकीय परंपरा’ यावर वैद्य जुवेकर यांची, तर वैद्य रेणुका गयाळ यांनी वैद्य धर्माधिकारी यांची ‘आयुर्वेद शास्त्र अध्ययन व व्यवहार’ या विषयावर मुलाखत घेतली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वैद्य हरीश पाटणकर लिखित ‘केशायुर्वेद’ पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन झाले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कुलच्या आवारातील गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ‘केशायुर्वेद’कार वैद्य हरीश पाटणकर, वैद्य स्नेहल पाटणकर, पंकज पाटणकर आदी उपस्थित होते.

वैद्य दिवाकर जुवेकर म्हणाले, “अलीकडच्या काळात आजारांचे प्रमाण वाढले आहे. यावर आयुर्वेद गुणकारी आहे. आयुर्वेदातील तत्वे नीट समजून घेतले आणि योग्य उपचार पद्धती वापरल्या, तर जनमानसात आयुर्वेद रुजायला मदत होईल. हीच गोष्ट लक्षात घेऊन वैद्य हरीश पाटणकर यांनी रुग्णांना आयुर्वेद उपचारांना तंत्रज्ञानाची जोड दिली आहे.”

वैद्य अनंत धर्माधिकारी म्हणाले, “पाटणकर यांनी अल्प काळात आयुर्वेदाला लोकप्रिय करण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. आयुर्वेदाचा अभ्यास करणे, आयुर्वेदाची जीवनशैली जगणे हे पुण्यकारक आहे. सुश्रुत संहिता, चरक संहिता असे अनेक ग्रंथ आयुर्वेद उपचारपद्धतीवर लिहीले गेले आहेत. त्याचे अध्ययन करून उत्तम आयुर्वेद सेवेवर आपण भर द्यायला हवा.”

वैद्य हरीश पाटणकर म्हणाले, वैद्य जुवेकर व वैद्य धर्माधिकारी यांना ऐकणे ही एक पर्वणी आहे. आयुष्यभर आयुर्वेद जगलेल्या या दोन्ही वैद्यांकडून आपल्याला हा ठेवा मिळाला आहे. केशायुर्वेदच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन या उभयतांच्या हस्ते झाले, याचा आनंद वाटतो.”

वैद्य स्नेहल पाटणकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. वैद्य विवेक आंबरे यांनी सूत्रसंचालन केले. पंकज पाटणकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा