घर Maharashtra Special खेळ कुणाला दैवाचा कळला? रविंद्र महाजनी यांचा जीवनपट

खेळ कुणाला दैवाचा कळला? रविंद्र महाजनी यांचा जीवनपट

170
0

-विवेक दिगंबरराव कुलकर्णी.

-तो मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वात देखणा नायक होता, त्याला मराठी चित्रपटसृष्टीतला मराठी विनोद खन्ना म्हणून ओळखले जात होते. एका चांगल्या अन सुसंकृत कुटुंबातून आलेला तो उत्तम माणूस म्हणूनही सर्वानाच परिचित होता. त्याच्या नावावर एक नव्हे अनेक यशस्वी चित्रपट आहेत. सर्व काही त्याच्या आयुष्यात उत्तम चालले होते इतके की दृष्ट लागण्यासारखे.. लागलीच त्याला दृष्ट.तो कर्जबाजारी झाला, लोकांनी त्याला आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली, पण त्याने हिंमत दाखवत यातूनही बाहेर पडायची जिद्द दाखवली,गेलेलं वैभव, पत प्रतिष्ठा त्याने पुन्हा मिळवायला सुरुवातही केली होती, त्यातच त्याचा एकुलता एक मुलगा ही नावारूपास यायला लागला होता.एका बापाला याहून अधिक काय हवे असते?मराठी चित्रपट सृष्टीचा नायक म्हणून ओळखण्याऐवजी लोक त्याला गश्मीर महाजनीचे वडील म्हणून ओळखायला लागले होते. सर्व काही आता पुन्हा सुरळीत होतेय असे वाटत असतानाच काल परवा त्याला परमेश्वराने एकटे असतानाच गाठले आणि तेही असे की तो आपल्यात नाहीये हे कळायला देखील तीन दिवस लागले,यासारखे दुर्दैव ते दुसरे काय असावे?

मराठी चित्रपट सृष्टीतले एक दोन नव्हे तर तब्बल 20 वर्षाहून अधिक काळ ज्यांनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले ते म्हणजे सर्वांचेचे लाडके अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी ,यांचा काल की परवा त्यांच्या तळेगावजवळील आंबे गावातील एक्बेरिया या सोसायटीतील एका भाड्याचे घरात आकस्मिक मृत्यू झाल्याची बातमी आज विविध चॅनेल्सवर झळकू लागताच असंख्य मराठी रसिकांच्या मनाला एक चुटपुट लागून गेली.
त्यांच्यावरच चित्रीत झालेल्या “खेळ कुणाला दैवाचा कळला”या गाण्याची अन त्याच्या अर्थाची जाणीवआज पुन्हा एकदा सर्वानाच प्रकर्षाने पटली.

1949 साली बेळगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. लोकसत्ता या सुप्रसिद्ध वर्तमानपत्राचे माजी संपादक हनुमंत आर महाजन हे त्यांचे वडील.रवींद्रजी यांना बालपणापासूनच चित्रपटसृष्टीचे प्रंचड आकर्षण होते. पूर्वीच्या काळी चित्रपटसृष्टीत काम करणे म्हणजे नको ते उद्योग करणे असे मानले जायचे, साहजिकच रवींद्र महाजनी यांच्या घरातूनही त्यांना याबद्दल खडे बोल सुनावले गेले,पण त्यांच्या मनात ,हृदयात आणि नशिबातही मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवणे असेच कदाचित ठामपणे लिहले असावे.अखेर घरच्यांनाही त्यांच्या या प्रेमाची खात्री पटली पण त्याआधी आपले शिक्षण पूर्ण करण्याची अट घातली गेली, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या आवडीच्या मार्गावर चालायला सुरुवात करण्यासाठी मुंबई गाठली अन इथेच त्यांना स्वप आणि वास्तव यातला भयावह फरक समजायला लागला,पण “हिंमत ऐ मर्दा तो मदद ऐ खुदा” यानुसार त्यांनी दिवसभर ठिकठिकाणी निर्मात्यांना भेटण्यासाठी तर आर्थिक गुजराण करण्यासाठी रात्री टॅक्सी चालवायला सुरुवात केली.असेही म्हटले जाते एवढ्या मोठ्या संपादकाचा मुलगा असूनही टॅक्सी चालवतो म्हणून त्यांना त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईक यांनी बेदखल करण्यास सुरुवात केली,याने त्यांना वाईट वाटले पण ते खचले नाहीत, याच दरम्यान त्यांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरवले, या धक्क्याने सावरत त्यांनी आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी जिद्दीने जिद्दीने लढायला सुरुवात केली.याच प्रयत्नात त्यांना मिळाला 1975 साली आलेला आणि अतिशय गाजलेला “झुंज”हा चित्रपट.हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांचा होता. या चित्रपटाच्या यशाने त्यांची ओळख संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला झाली अन इथून पुढे सुरु झाले त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीवर आणि चाहत्यांच्या मनावरील अधिराज्य. रंजना, आशा काळे या सुप्रसिद्ध मराठी नायिकांसोबत त्यांची पडद्यावर जोडी जमली अन त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला दिले.मुंबईचा फौजदार,झुंज, देवता,देवघर, गोंधळात गोंधळ ,आराम हराम आहे,हळद कुंकू, ते देऊळबंद,पानीपत असे एकाहून एक लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. अतिशय रुबाबदार असे व्यक्तीमत्व असलेल्या रविंद्रजीना चांगला आवाज,उत्तम अभिननाची जाण असलेन्या त्यांना यश मिळणे स्वाभाविकच होते, पुर्वीच्या काळी आताइतके जरी आर्थिक उत्पन्न चित्रपटात नसले तरीही या देखण्या नटाने आपल्या दमदार कामाने पैसा आणि नाव दोन्हीही कमावले होते. योगायोग म्हणजे मला प्रत्यक्ष त्यांना एकदा नव्हे तर बऱ्याचदा कोथरूड येथे मेडिकल दुकानात काम करत असताना भेटण्याची संधी मिळाली. सुप्रसिद्ध अभिनेते श्रीकांतजी मोघे, रमेश भाटकर,गायिका शैलाताई दातार या आमची दुकानात नियमित औषधे घ्यायला येत असत.मी खेडेगावात जन्मलेला असल्याने रजत पडद्यावरील ही महानायक मंडळी बघायला मिळणे म्हणजे माझ्यासाठी स्वर्गीय देवता प्रत्यक्ष बघण्यासारखे असे.पण खरेच सांगतो ते माणुस म्हणूनही खूप उत्तम होते.मी कशावरही त्यांना सही मागायचो आणि ते कधीही नाही म्हणत नसत.

हळूहळू वय वाढत चालले तसे त्यांना काम मिळणे कमी होत गेले,असे म्हणतात की चित्रपट सृष्टीतली अनिश्चितता पाहून त्यांनी बांधकाम व्यावसायिक होण्याचे ठरवले अन इथेच त्यांचा घात झाला.यातून त्यांना अपयश आले आणि ते आर्थिकदृष्ट्या संपूर्ण पणे डबघाईला आले. पुढे त्यात त्यांचे काय झाले हे बघायला कोणालाही वेळ नव्हता. कचकड्याच्या दुनियेतल्या व्यवहारी लोकांनी त्यांना संपूर्णपणे विसरणेच योग्य समजले आणि अगदी तसेच केले सुद्धा. या धक्क्याने ते पूर्णपणे खचले पण त्यांच्या मुलाने वयाच्या 15 व्या वर्षीच अकाली मोठे होत आपला मुलगा होण्याचा धर्म निभावला आणि प्रचंड कष्ट करून त्यांना यातून बाहेर काढले सुद्धा.याचा त्यांना प्रचंड अभिमानही होता. पण का कुणास ठावूक ते मागील काही महिन्यांपासून एकटेच राहत होते. तळेगावजवळील आंबे गावातील एक्सबेरीया या सोसायटीमध्ये ते एका भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहत होते. त्यांच्याकडे कोणी येत होते की नव्हते परमेश्वरालाच माहिती, पण आज त्यांच्या फ्लॅट मधून दुर्गंधी येवू लागल्याने शेजारी असलेल्या लोकांनी पोलिसांना फोन केला, पोलिसांनी दार ठोठावले पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असताना एकेकाळचा हा देखणा,राजबिंडा शरीरयष्टीचा मालक मृतावस्थेत सापडला, त्यांचे निधन कसे झाले कधी झाले याचे उत्तर आता पोस्टमार्टेम मधे सापडेलही,पण एकेकाळचा हा सुपरस्टार अशा पध्दतीने जावा हे सत्य सत्य असूनही मनाला पटत नाही.त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या मुलाला पोलिसांनी दिली आहे, तो मुंबईवरुन त्यांना सॉरी शरीराला घ्यायला निघालाही आहे. आज उद्या त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार होतीलही,पण त्यांच्या मनाला झालेल्या यातना, मिळालेले धक्के यांचे काय?

परमेश्वर निष्ठूर आहे की आपले कर्म असे दुःख असा एकांत(विजन)वास नशिबी आणतात या प्रश्नाचे उत्तर खरे तर कोणालाही मिळत नाही, रवींद्र महाजनी असे एकटे अन किरायाच्या घरात स्वतःचे कुटुंब असतानाही का राहत होते या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या चाहत्यांना उद्या मिळतील न मिळतील,पण त्यांच्या अशा मृत्यूने कोणालाही वेदना नक्कीच होतील.देवता या त्यांच्याच चित्रपटातले एक अतिशय लोकप्रिय गीत आज सकाळपासून वारंवार ओठी येत आहे”खेळ कुणाला दैवाचा कळला?”या देखण्या अन उत्तम अभिनेत्याच्या आत्म्याला सदगती मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा