घर Politics शिवसेना हे नाव इतर कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही: उद्धव ठाकरे

शिवसेना हे नाव इतर कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही: उद्धव ठाकरे

139
0

अमरावती: प्रतिनिधी

निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. मात्र, शिवसेना हे नाव आपल्यापासून हिरावून ते इतर कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. शिवसेना हे नाव आपले आजोबा प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी दिलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

विदर्भाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी  निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले.

‘आता सुरू आहेत पक्षाच्या चोऱ्या’

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेऊन भाजपाशी संधान बांधले. या घटनेला एक वर्ष पूर्ण होते तोवरच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून दूर जात भाजपच्या साथीने उपमुख्यमंत्री पद मिळविले. या दोन्ही नेत्यांनी आपण पक्ष त्याग केलेला नाही. अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपले आहेत असे दावे केले. या प्रकारांबाबत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ठपका ठेवला. पक्षांमध्ये फूट पडणे यात नवीन काहीही नाही यापूर्वीही पक्षांमध्ये फाटाफूट झाली आहे. मात्र सध्याच्या काळात पक्षच चोरून नेण्याचे प्रकार घडविले जात आहेत, असे ठाकरे म्हणाले.

मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते पण…

आपल्याला मुख्यमंत्रीपदावर बसण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. त्यामुळे नाईलाजाने ही जबाबदारी स्वीकारावी लागली, असा दावा ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला.

… तर बाहेरचे टेकू घ्यायची गरज पडली नसती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले आमदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्यामुळे सरकार धोक्यात येऊ नये म्हणून भाजपाने अजित पवार यांना गळाला लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, जर भाजपाने सन २०१९ मध्ये दिलेला शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द पाळला असता, तर त्यांना हे बाहेरचे टेकू घेण्याची आवश्यकता पडली नसती.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा