मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. डॉ गोऱ्हे या शिंदे गटात गेल्याने व्यक्तीश: उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
डॉ गोऱ्हे या महिला सक्षमीकरण चळवळीतून सक्रिय राजकारणात आलेल्या अनुभवी राजकारणी आहेत. सन १९९८ पासून त्या शिवसेनेत कार्यरत आहेत. धडाडीच्या नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ गोऱ्हे यांनी जोरकसपणे तरीही अभ्यासू पद्धतीने शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्या विधान परिषदेच्या आमदार असून उपसभापतीही आहेत.
राजकीय वर्तुळात आणि खुद्द शिवसेनेतही अनेक जण खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या फुटीला जबाबदार मानतात. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या संघटनेतून बाहेर पडण्यासाठी नव्याने पक्षात आलेल्या आणि अल्पावधीत महत्त्वाचे स्थान निर्माण करणाऱ्या सुषमा अंधारे जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. या आधी काही दिवस आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाचा त्याग करून शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता डॉ गोऱ्हे यांच्या शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.