घर Politics मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष: शरद पवार

मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष: शरद पवार

111
0

 बैठक बेकायदा असल्याचा अजित पवारांचा दावा

नवी दिल्ली: प्रतिनिधी

पक्षाच्या अध्यक्षपदावर कोणी कितीही दावे केले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना केली. मात्र, ही बैठकच बेकायदेशीर असल्याचा दावा बंडखोर नेते अजित पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर कार्यकारणी सदस्यांना धीर देण्यासाठी पवार यांनी राजधानीत राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला पी सी चाको, जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण, फौजीया खान यांच्यासह १३ सदस्य उपस्थित होते. आपण सर्वजण निर्विवादपणे शरद पवार यांच्या पाठीशी आहोत, असे या सदस्यांनी सांगितले.

या बैठकी संबंधात पत्रकारांना माहिती देताना चाको म्हणाले की, या बैठकीत एकूण आठ ठराव संमत करण्यात आले. पक्षाच्या देशभरातील २७ प्रदेश कार्यकारिणी शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांना पक्षातून काढून टाकण्याच्या पवार यांच्या निर्णयाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

पक्षाच्या अध्यक्षपदावर अजूनही मीच विराजमान आहे. माझे वय ८२ असो वा ९२, मी अजून कार्यक्षम आहे. पक्षात आणि देशाच्या राजकारणात माझा प्रभाव अद्याप टिकून आहे. पक्ष फुटी बाबत निवडणूक आयोगाकडे आपली बाजू ठामपणे मांडू, असे पवार यांनी या बैठकीत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने पवार यांच्याकडे संवेदना व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी दूरध्वनीवरून पवार यांच्याशी संपर्क साधला तर देशभरातील भाजप विरोधकांचा चेहरा म्हणून पुढे येणारे नेते राहुल गांधी यांनी पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

दरम्यान, अजित पवार यांनी ही बैठकच बेकायदा असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगाच्या कक्षेत आहे. त्यामुळे सध्या पक्षांतर्गत बैठका घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे अजित पवार यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा