घर Politics अजितदादांकडे एकोणतीस तर शरद पवारांकडे सतरा आमदारांची उपस्थिती

अजितदादांकडे एकोणतीस तर शरद पवारांकडे सतरा आमदारांची उपस्थिती

114
0

मुंबई: प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलाविलेल्या वेगवेगळ्या बैठकांना अनुक्रमे १४ आणि २९ आमदार उपस्थित राहिले. शरद पवार यांच्या बैठकीत पक्षाचे चार खासदारही उपस्थित होते. दरम्यान, आपल्याला पक्षाच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांचे समर्थक छगन भुजबळ यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीत सहभागी होऊन मंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी आपण काटेकोरपणे खातरजमा करून घेतली आहे. कोणत्याही घाईगडबडीने हा शपथविधी पार पडलेला नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

शरद पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला आमदारांनी उपस्थित राहावे यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी पक्षादेश जारी केला होता. बैठक सुरू होण्यापूर्वीच शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्वर ओक’च्या बाहेर आणि यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या परिसरात पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच, ‘८३ वर्षाचा योद्धा एकाकीच निघाला,’ अशा अर्थाची पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी शक्तिप्रदर्शन सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड पुकारताना ज्या अजित पवारांच्या विरोधात आरोपांचे रान उठवले, त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसणार, ज्या अजित पवारांनी तत्कालीन अर्थमंत्री असताना शिवसेनेचे आमदारांना निधी दिला नाही म्हणून त्यांच्या मतदारसंघातील कामे रखडली असा आरोप केला, त्यांनाच शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना पुन्हा अर्थमंत्री पद मिळाले तर मतदारांना काय तोंड दाखवणार, असा सवाल शिंदे गटाचे आमदार करत आहेत. सत्तेत अजित पवार यांचा गट सहभागी झाल्याने शिंदे गटाच्या वाटेची मंत्रिपदे कमी होणार असल्याबद्दलही अनेकांचा आक्षेप आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला अधिकार वापरून अजित पवार यांना अर्थमंत्री पद देऊ नये तसेच भाजपा बरोबर युती करताना झालेल्या चर्चेत मान्य केल्याप्रमाणे सर्व मंत्रिपदे शिंदे गटाला मिळावी. अजित पवार गटाला भाजपच्या कोट्यातून मंत्रीपदे देण्यात यावी अशी मागणी शिंदेसमर्थक आमदारांकडून केली जात आहे. या आमदारांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे देखील चर्चा आणि बैठका घेत असल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा