घर Pune City नाथ संप्रदायानें जातीपातीच्या प्रथा मोडत मानवतेची शिकवण दिली: श्रीपाल सबनीस

नाथ संप्रदायानें जातीपातीच्या प्रथा मोडत मानवतेची शिकवण दिली: श्रीपाल सबनीस

85
0

पुणे: प्रतिनिधी

नाथ संप्रदायाने जातीपातीच्या अडगळी व परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत मानवतेचा संदेश दिला, असे मत प्रसिद्ध साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित आयोजित केलेल्या नाथ पुरस्कार प्रदान सोहळ्यात सबनीस बोलत होते. या सोहळ्यात प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते दिपक पायगुडे, शिल्पकार विवेक खटावकर, पोलिस उपअधीक्षक राहुलकुमार येवले, उद्योजक ललित जैन, झिल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयेश काटकर, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब पारगे, योग प्रशिक्षक मोहनराव खैरे व अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट या संस्थेस पारवडेश्वर महाराज ट्रस्टचे मठाधिपती सदगुरु भाऊ महाराज व सबनीस यांच्या हस्ते नाथ पुरस्कार प्रदान करून त्यांचा खास सन्मान करण्यात आला.

प्रसिध्द अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार व सदाशिव पेठेत नुकत्याच झालेल्या घटनेत एका महाविद्यालयिन तरुणीचा प्राण वाचविल्याबद्दल लेशपाल जवळगे व हर्षद पाटील यांचा शौर्य पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ, व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे नाथ पुरस्काराचे हे २३ वे वर्ष होते.

याप्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, लिज्जत पापडचे सुरेश कोते, ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी, डॉ एम ए नजीब, बाळासाहेब अमराळे, दिपक दाते, विठ्ठल कदम संजीव मिराशी आदी मान्यवर उपस्थित होते.

सबनीस आपल्या भाषणात म्हणाले की, नाथ संप्रदायाची परंपरा श्री पारवडेश्वर महाराज ट्रस्टने जपली आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानली पाहिजे. जनसेवेच्या माध्यमातून मानवता जागवली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, नाथ संप्रदायाने गुरुशिष्य परंपरा जपली पण आजकालच्या काळात काही ढोंगी बदमाश लोकांनी आश्रमाची परंपरा मोडीत काढत या व्यवस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्या तुलनेत पारवडेश्वर महाराज ट्रस्टची परंपरा वेगळी आहे. या ट्रस्टने व्यसनमुक्ती व अन्य समाजोपयोगी कार्य करीत नाथ संप्रदायाचा मानवतेची सेवा करण्याचा वारसा पुढे चालवला आहे.

ट्रस्टचे मठाधिपती भाऊमहाराज म्हणाले की, गुरूंनी दिलेली शिकवण आपण सर्वांनी आत्मसात करून जतन केली पाहिजे. नाथ संप्रदायाने लोकांचे कल्याण करण्याचे कार्य केले. प्रत्येकाने सेवाभावी काम केले पाहिजे.

ज्येष्ठ पत्रकार माळी यांनी सांगितले की, काही विकृत लोक भक्तिमार्गाचा दिखावा करून मंदिरांच्या कामकाजात हस्तक्षेप करून गैरप्रकार करीत आहेत. हे थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, खटावकर, खैरे, जैन आदी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीची समयोचित भाषणे झाली.

बाळासाहेब अमराळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विठ्ठल पवार यांनी प्रास्ताविक व अशोक पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. राजीव गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा