घर Health ‘हाडांचे आजार टाळण्यासाठी जीवनशैली बदला’

‘हाडांचे आजार टाळण्यासाठी जीवनशैली बदला’

88
0

अस्थिरोग तज्ञ डॉ. तुषार दाते यांचा सल्ला

पुणे: प्रतिनिधी

बदलती जीवनशैली, चालणे, उठणे व बसण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात हाडांशी संबंधित आजार दिसून येतात. हाडांच्या मजबुतीसाठी सर्वांनी कोवळ्या उन्हात बसणे कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन आणि दैनंदिन जीवनशैली मध्ये संतुलन ठेवणे कालानुरूप गरजेचे आहे, असा सल्ला प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. तुषार दाते यांनी दिला.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोथरूड हॉस्पिटलमध्ये विनामूल्य आरोग्य शिबिर व मोफत औषधे वाटपांचे आयोजन  करण्यात आले. या शिबिराचा लाभ 180 नागरिकांनी घेतला. कोथरूड हॉस्पिटल आणि श्री संताजी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात हाडांच्या आजारांवर विशेष उपचार व निदान करण्यात आले. हाडांच्या सर्व तपासण्यांसह संधीवात, अंगदुखी, मान दुखी, मणक्याचे आजार, कंबरदुखी, फ्रॅक्चर, हाडांचा ठिसूळपणा, खुब्याचे आजार, गुडघ्यांचे आजार, स्त्री रोग, कर्करोग, त्वचेचे आजार, पोटाचे विकार, छातीचे आजार व मधुमेहाची तपासणी, विटामिन डी ३ तपासणी व  ईसीजी यांच्यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली.

सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेले हे शिबिर दुपारी ४ वाजेपर्यंत चालले. शिबिराचा लाभ स्त्री, पुरुष, युवा व वृद्ध यांनी घेतला. कोथरूड हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर, प्रसिद्ध सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावार, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजुषा प्रभूणे यांच्याबरोबर, डॉ. निखील ओझा, व डॉ. धीरज राणे आदींनी रुग्णांना उपचार व मार्गदर्शन केले.  शिबिरात 6 रुग्णांमध्ये कॅन्सरचे प्राथमिक लक्षणे आढळून आले.

या वेळी डॉ. राजेंद्र मीटकर यांनी सांगितले की, शिबिरात येणाऱ्या रुग्णांमध्ये जटिलता आढळल्यास त्यांना येथे माफक दरात शस्त्रक्रिया व उपचार दिले जाणार आहे. या शिबिराला कोथरूड येथील श्री संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सामाजिक, राजकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा