घर Uncategorized मोदी हटाव म्हणणारे विरोधक कटाव हीच आमची भूमिका: रामदास आठवले

मोदी हटाव म्हणणारे विरोधक कटाव हीच आमची भूमिका: रामदास आठवले

48
0

 

शिर्डी: प्रतिनिधी

पाटणा येथे बैठकीत जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचे ‘मोदी हटाव’ हे एकमेव धोरण आहे. मात्र, मोदी हटाव म्हणणाऱ्या विरोधकांना कटव हे आमचे धोरण आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी पंधरा-सतराच काय शंभर विरोधक एकत्र आले तरीही त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. उलट विरोधक जेवढे एकत्र येऊन विरोधी प्रचार करतील तेवढी मोदी यांची लोकप्रियता वाढत जाईल, असा दावा आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

विरोधकांनी कितीही आकांड तांडव केला तरीही सन २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावाही आठवले यांनी केला.

… तर ४० आमदार फुटले नसते

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणे ही उद्धव ठाकरे यांची अगतिकता होती. मात्र, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांच्या मांडीला मांडी लावून बसताना ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून ते दूर झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आठवले यांनी यावेळी दिला. ठाकरे हे मुक्ती यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते आणि बाजूला मला उभे केले असते तर एवढे आमदार फुटले नसते, असेही ते म्हणाले.

भारत राष्ट्र समितीचा प्रभाव पडणार नाही

सध्या राज्यात सर्वत्र भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे फलक दिसून येत आहेत. एखादा नवीन पक्ष आल्यानंतर इकडचे तिकडचे काहीजण त्या पक्षाबरोबर जात असतात. मात्र, राव यांचा पक्ष तेलंगणाचा आहे. त्यांचा महाराष्ट्रातील राजकारणावर फारसा प्रभाव पडणार नाही. मतदारांकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही, अशी शक्यता आठवले यांनी वर्तवली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा