घर Uncategorized पाय चालतात तोपर्यंत रंगभूमीची सेवा करणार: प्रशांत दामले

पाय चालतात तोपर्यंत रंगभूमीची सेवा करणार: प्रशांत दामले

76
0

पुणे : प्रतिनिधी

व्यवसायात चुका करण्याची संधी असते. मात्र, परत परत एकच चूक होऊ नये, अशा मतांचा मी आहे. कुठलाही आणि कितीही मोठा कलाकार असाल तरी त्यांच्याकडे अपमान, नकार पचवण्याची ताकद असलीच  पाहिजे. अपमान का झाला, गटहे समजून घेऊन काय करायचे नाही हे ठरवले की आपण योग्य दिशेने जातो असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने – नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी केले. आपले पाय जोपर्यंत चालत राहतील तोपर्यंत आपण रंगभूमीची सेवा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित बालगंधर्व रंगमंदिर ५५ वा वर्धापन दिन सोहळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी थेट भेट या कार्यक्रमात सौमित्र पोटे यांनी प्रशांत दामले यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले की ते सुखं असतं असे सांगत प्रशांत दामले म्हणाले, आजपर्यंत माझे १२ हजार ७२३ प्रयोग झाले आहेत, त्यामध्ये फक्त दोन वेळा प्रयोग रद्द करावे लागले आणि तेही माझा आवाज बसल्यामुळे. माझ्या या प्रवासात माझे सहकारी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे होते. मला जे हवं होतं ते मिळत नाही असे वाटल्याने एकवेळ थांबाव वाटलं होत पण विचार केला मी दुसरं करणार काय, असा प्रश्न होता. निर्माता म्हणून माझ्यावर एक वेगळी जबाबदारी आहे याचीही जाणीव झाली. यामुळे मी तो विचार मनातून काढून टाकला. आज मात्र निश्चयाने सांगतो की जो पर्यंत माझे पाय चालतात तो पर्यंत रंगभूमीची सेवा करणार.

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाविषयी बोलताना दामले म्हणाले, मी काही बदलायच्या भानगडीत पडत नाही. मी नव्याने करण्यावर विश्वास ठेवतो.आपले यशवंत नाट्य संकुल बंद होते ते सुरू केले. नाट्यसंमेलन ही एक महत्वाची जबाबदारी आहे. ती पार पडणारच. नवोदित कलाकारांना मुंबईत आसरा कसा द्यायचा यावर प्राधान्यक्रमाने विचार करतोय. नाट्यगृहांची दुरावस्था दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  तसेच नाट्य परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व ५८ शाखांचे लेखापरीक्षण करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारूडसम्राट सावता फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या  भारुडाने  झाली.  यानंतर वनमाला लोणकर, छाया जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळागौर सादर केली.

दुपारच्या सत्रात महिलांसाठी विशेष आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात नमिता पाटील, अर्चना जावळेकर, पूनम कुडाळकर, सुप्रिया जावळेकर, कामिनी गायकवाड, रुही संगमनेर, सीमा पटेल, पूजा निर्भवणे, अलका जगताप, वर्षा पवार, जुई आणि अंजली नागपूरकर यांनी आपल्या अदाकारीने रसिकांची मने जिंकली. त्यांना वर्षा जगताप, स्वाती लोंढे, गायत्री कद्रेकर यांची गायन साथ लाभली.

बारामती  अॅग्रोच्या  सुनंदाताई पवार, ज्येष्ठ ढोलकी पट्टू पांडुरंग घोटकर,  तेजल राजे दाभाडे सरकार, सोनालीताई मारणे, मीनाताई सातव आणि बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर कार्यक्रमालाउपस्थित होते. लावणी महोत्सवाचे सूत्रसंचालन कुमार पाटोळे, अभिजित राजे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा