छत्रपती संभाजीनगर येथे पु. ला. तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा संपन्न
पुणे : छत्रपती संभाजीनगर येथील ‘पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन’ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘स्मृतीगंध २०२३’ मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना २५ लाख रूपयांची मदत करण्यात आली. यावेळी लाभार्थी विद्यार्थी , पालक व महाविद्यालयाचे अध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी. एच. क्षिरसागर, माजी पर्यवेक्षक नंदू कुलकर्णी , बाळसराफ , प्रमोद काळे आणि प्रसिद्ध सिने अभिनेता गिरीश कुलकर्णी तसेच पुणे मुंबईसह राज्यात नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरीत झालेले २२५ माजी विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक व व्यवसायात आर्थिक हातभार लावून त्यांना समाजात आत्मविश्वासाने उभे करण्याचे कार्य माजी विद्यार्थीसंघाच्या ‘ऋणानुबंध’ या संस्थेच्या वतीने केले जाते. या प्रसंगी पु.ला. तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र नलगे यांनी पदभार स्वीकारला.
दरम्यान, ऋणानुबंध या समाजसेवी संस्थेच्या उपक्रमांची आणि झेप या तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना केलेल्या मदत कार्याची सविस्तर माहिती अतुल कुलकर्णी व संजय आयाचीत यांनी दिली.
ऋणानुबंध संस्थेने आजवर लाखोंचा निधी गरीब लोकांच्या उद्धारासाठी वितरित करण्यात आला असून, त्यात प्रामुख्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि त्यांची शाळकरी मुले , पु.ला. तंत्रनिकेतन चे गरीब विद्यार्थी , तंत्रनिकेतन चे दिवंगत माजी विद्यार्थी आणि त्यांची विद्यार्थी मुले , बाह्य महाविद्यालयातील विद्यार्थी , खेळाडू , रुग्ण , लायब्ररी इत्यादीसाठी मदतीचा समावेश आहे.
शेतकरी कुटुंबांनी पिठाची गिरणी, मिरची कांडप, छोटे गॅरेज , शिलाई मशीन, पशुपालन , किराणा दुकान इत्यादी उद्योग सुरू केले असून, गेल्या ५ वर्षापासून ही शेतकरी कुटुंबे स्वतः च्या पायावर भक्कमपणे उभे आहेत. तसेच त्यांची मुले ही उच्च शिक्षण घेवून डॉक्टर , इंजिनीअर्स झाले आहेत.