घर Pimpri-Chinchwad मोदी सरकार कामगार संघटनां विरोधात – सी. एच. व्यंकटचलम्

मोदी सरकार कामगार संघटनां विरोधात – सी. एच. व्यंकटचलम्

145
0

आकुर्डीत महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनच्या दोन दिवसीय परिषदचे उद्घाटन

पिंपरी पुणे (दि. २५ मार्च २०२३) – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बँकिंग क्षेत्रातील संघटनांच्या विरोधात आहे. बँकांचे खासगीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, बँकिंग एम्प्लॉईज संघटनेने त्यास कडाडून विरोध केला आहे. सरकारची ही मनीषा कदापिही पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी एकत्रितपणे तीव्र लढा उभारला पाहिजे, असे मत ऑल इंडिया बॅंकिंग एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए) जनरल सेक्रेटरी सी. एच. व्यंकटचलम् यांनी व्यक्त केले.

आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे शनिवार (२५ मार्च) महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व्यंकटचलम् यांनी देशातील बॅंकिंग क्षेत्रातील प्रश्न, समस्या, सरकारी धोरणास तीव्र विरोध करत याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कामगार नेते कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. देवदास मेनन महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी एआयबीओए, कॉ. नंदकुमार चव्हाण अध्यक्ष एआयबीओए महाराष्ट्र, कॉ. देविदास तुळजापुरकर जनरल सेक्रेटरी, उपाध्यक्ष कॉ. चंद्रेश पटेल, कॉ. शिरीष राणे, कॉ. नाना ठोंबरे, कॉ. ललिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कॉ. व्यंकटचलम् म्हणाले की, केंद्र सरकार देश कामगार युनियन मुक्त असला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने धोरण बदलण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. बॅंकांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. भारतात परदेशी बॅंकांसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. त्याचा गंभीर परिणाम देशातील बॅंकिंग क्षेत्रावर होणार आहे. हे सर्व पुढील धोके पाहता एआयबीईए संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यासाठी सज्ज आहे. देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन सरकारच्या कामगार विरोधी धोरणास तीव्र विरोध करून प्रसंगी आंदोलनाची तयारी करावी, असे व्यंकटचलम् यांनी सांगितले.

कॉ. भालचंद्र कांगो म्हणाले, काळानुरूप कामगार संघटनांनी कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे. आंदोलन करताना मानवी मुल्य जपण्याची गरज आहे. बँक संघटनांनी लढा उभारताना सर्व सामान्य नागरिक, बँक ग्राहकांना त्यात सहभागी करून घेतले तर लढा यशस्वी होईल. एकीकडे तंत्रज्ञानानाचे स्वागत करताना युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार नाही ना याचा विचार झाला पाहिजे.

दुपारच्या सत्रात सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. खासगीकरणाचा सर्वाधिक फटका महिला वर्गाला बसणार आहे. त्यांचे हक्क डावलण्यात आल्याने अनेक महिलांना रोजगार गमावण्याची शक्यता आहे. संघटीत क्षेत्रात महिलांना रोजगार संधी कमी होतील अशी भीती भिसे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता जोशी, स्वागत चंद्रेश पटेल, प्रास्ताविक देविदास तुळजापुरकर तर आभार शिरीष राणे यांनी मानले. परिषदेस बँक कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा