घर Pimpri-Chinchwad पीएमपीएल ने उडवली नागरिकांची झोप ; ज्येष्ठ नागरिकांचे स्वास्थ्य आणि इतरांचे मन:स्वास्थ्य...

पीएमपीएल ने उडवली नागरिकांची झोप ; ज्येष्ठ नागरिकांचे स्वास्थ्य आणि इतरांचे मन:स्वास्थ्य धोक्यात

148
0

पुणे: प्रतिनिधी

कात्रज येथील पीएमपीएल बस डेपो येथे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य धोक्यात आणून ठेवले आहे. या बाबत पीएमपीएल प्रशासन, महापालिका, पोलीस आणि प्रदूषण महामंडळ यांच्याकडे दाद मागितली असता त्यांच्याकडून केवळ हात वर करण्याची भूमिका घेतली जात आहे.

कात्रज येथील बस डेपोच्या आवारात आणि त्याच्या लगत असलेल्या पुणे सातारा मार्गावर रात्रीच्या वेळी शेकडो बसेस उभ्या केल्या जातात. बसेस बंद करताना रात्री ११ते २ आणि सुरू करताना पहाटे ४ ते ७ या कालावधीत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.

बसेस बंद करताना आणि सुरू करताना बराच वेळ त्याचे इंजिन सुरू ठेवले जाते. या दरम्यान बसेसला ऍक्सीलरेटर देऊन मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केले जाते. त्यामुळे स्थानिक नागरिकांची झोप उडाली आहे.

या ध्वनी प्रदूषणामुळे परिसरातील नागरीक, विशेषत: ज्येष्ठ नागरीक, लहान मुले आणि विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीची झोप न झाल्याने दिवसभर चिडचिडेपणा वाढल्याने या परिसरातील नागरिकांचे मानसिक, पर्यायाने कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे.

… तर महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

या संदर्भात स्थानिक नागरिकांनी पीएमपीएल प्रशासन, महापालिका यांच्याकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून नवी जागा शोधत असल्याचे सांगून तोंडाला पाने पुसली जात आहेत. पोलीस आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडून संबंधित तक्रारींची दखल घेण्या ऐवजी त्याला केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या. नागरिकांनी प्रसंगी महापालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा