घर Pune पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला दिली भेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला दिली भेट

167
0

पुणे दि. १७: जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.

विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी बैठकीसाठी चांगली तयारी केल्याबद्दल यावेळी प्रशासनाचे कौतुक केले.

पालकमंत्री पाटील यांनी प्रदर्शनातील विविध दालनात प्रदर्शित वस्तू, उत्पादने, योजना आदींबाबत  संबंधितांशी चर्चा केली. बैठकीच्या निमित्ताने पुण्यातील उत्पादनांची माहिती परदेशातील प्रतिनिधींना करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने स्थानिक उत्पादनांना ओळख मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुणे शहर आणि राज्याची क्षमता जगासमोर प्रदर्शित होत असल्याबद्दल श्री.पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी दालनाला भेट द्यायला आलेल्या प्रतिनिधींशीदेखील पालकमंत्र्यांनी संवाद साधला. राज्यातील पारंपरिक तृणधान्य व त्याच्या आहारातील महत्त्वाविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली.

परदेशी पाहुण्यांना महाराष्ट्राच्या उत्पादनात रुची

बैठकीसाठी आलेल्या पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या उत्पादनांमध्ये विशेष रुची दाखवली. भरडधान्याच्या पदार्थांची चव आवडल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. विशेषत: हिमरू शाली, पैठणी, हाताने तयार केलेल्या कागदपासून तयार केलेल्या भेटवस्तू आदींमध्ये प्रतिनिधींनी विशेष रुची दाखवली. शहरातील प्रकल्प आणि  महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहितीदेखील यावेळी पाहुण्यांना देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संचलित हात कागद संस्था पुणे यांनी हातकागदापासून बनवलेल्या दैनंदिनी, संस्मरणीय भेटवस्तू, आकर्षक कागदी दिवे, घरच्या घरी हात कागद बनवण्यासाठी नव्यानेच सादर केलेले नावीन्यपूर्ण किट, ज्यूटचे फाईल फोल्डर, ड्रॉइंग ब्लॉक्स आदी विविध वस्तू प्रदर्शित केल्या. त्यात विदेशी पाहुण्यांनी विशेष रस दाखवला.

वन विभागामार्फत बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत पर्यावरणीय सभ्यता विकास संस्थेने बांबूनिर्मित हाताने बनवलेल्या वस्तू, शोभेच्या वस्तू, भेटवस्तू, पारंपरिक गरजेच्या वस्तू, कार्यालयात ठेवण्याच्या वस्तू, फर्निचर आदी सुरेख वस्तू  पाहताना त्यातील कलाकुसरीबद्दल त्यांनी कौतुकद्गार काढले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पर्यटन स्थळांची आणि पर्यटन सुविधा विशेषतः पुणे, कोकण, रत्नागिरी, रायगडमधील पर्यटन स्थळांची माहिती आणि महाराष्ट्र टुरिझम मॅपचे माहितीपत्रक देण्यात येत होते.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा स्टॉल येथे महामंडळाने उद्योग विकासासाठी निर्माण केलेल्या सुविधांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले जात होते.

भारतीय आदिवासी सहकारी विपणन संस्थेच्या दालनामध्ये आदिवासी करागिरांमार्फत निर्मित हिमाचल प्रदेशातील पश्मीना शॉल, याकुल शॉल, आसामचे मुगा सिल्क, लाकूड व नैसर्गिक उत्पादनापासून निर्मित सौंदर्य आभूषणे, वारली पेंटिंग, गोंड पेंटिंग, टसर रेशीमपासून बनवलेल्या साड्या, वूलन जॅकेट, खादी, लिनेन कुर्ता, धातूवरील नक्षिकाम, ज्युटच्या वस्तू, बांबू उत्पादने तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत युनिव्हर्सल ट्राईब संस्थेने वारली पेंटिंग, वारली कलाकुसर यातून होणारे भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन पाहुण्यांना भावले.

महिला बचतगटांची विविध उत्पादने, हस्त निर्मित साबण, बांबूच्या ज्वेलरी याशिवाय ज्वारी, बाजरी, नाचणी निर्मित खाद्य पदार्थांनी परदेशी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. हे पदार्थ आरोग्यास पोषक असल्यामुळे त्यांना जगभरात मागणी वाढत असून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.

अनुभवले भविष्यातील सुंदर नदीकिनारे

पुणे महानगरपालिकेने मुळा, मुठा नदी सुधार प्रकल्प, जायका अर्थसहाय्यित प्रकल्पाची व्हर्चुअल रियालिटी हेडसेटच्या माध्यमातून आभासी सादरीकरण केले. हा हेडसेट परिधान करून प्रत्यक्ष भविष्यातील सुशोभित नदीकिनाऱ्यावर संचार करण्याचा अनुभव घेता येत होता. ही माहितीही प्रतिनिधींनी जाणून घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा