घर Maharashtra Special ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ.विश्वास मेहेंदळे यांचे निधन

ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ.विश्वास मेहेंदळे यांचे निधन

112
0

मुंबई: प्रतिनिधी

ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक असलेले विश्वास मेहंदळे हे लेखक आणि अभिनेतेही होते. त्यांनी १८ हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. अनेक मराठी नाटकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. मराठी नाट्यसृष्टीचे सर्वांगीण अभ्यासक म्हणून ते ओळखले जात.

विश्वास मेहेंदळे सुरुवातीच्या काळात पुणे आणि मुंबईतील कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांची माध्यम क्षेत्रात दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून कारकीर्द सुरू झाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकपदही त्यांनी सांभाळले. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी त्यांनी पार पडली. ‘सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस्थापक होते.

डॉ. विश्वास मेहेंदळे हे दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक होते. दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या त्यांनी वाचल्या. मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदकही तेच होते. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनच्या मुंबई केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालक होते.

विश्वास मेहेंदळे यांचा ‘मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. याव्यतिरिक्त अग्निदिव्य, एकच प्याला, एक तमाशा अच्छा खासा, खून पहावा करून, जर असं घडलं तर, नांदा सौख्यभरे, पंडित आता तरी शहाणे व्हा, प्रेमा तुझा रंग कसा यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये मेहेंदळे यांनी भूमिका साकारल्या.

सृजन फाउंडेशनने महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात आयोजित केलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी भूषवले. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेच्या पुणे शाखेकडून ‘मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाकार’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा