घर Pimpri-Chinchwad मोशीतील टोल वसुली तात्काळ बंद करा : दीपक मोढवे-पाटील 

मोशीतील टोल वसुली तात्काळ बंद करा : दीपक मोढवे-पाटील 

168
0

सामान्य वाहनचालकांना दिलासा देण्याची मागणी

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी

पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे पथकर वसुली टोलनाका पुन्हा सुरू करण्यात आला असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून टोल वसुली केली जात आहे. मात्र, यामुळे वाहनचालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सदर टोल वसुली तात्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राजगुरूनगर, चाकण आणि नाशिक फाटा या पट्टयात नियमित वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त आहेत. रस्ता रुंदीकरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना तासंतास वाहतूक समस्येचा सामना करावा लागतो. त्याच टोलनाक्‍यांवरील रांगांमुळे मोशीतून अवघ्या सहा सात किलोमीटर असलेल्या चाकणला किंवा चार किलोमीटरवर असलेल्या भोसरी, नाशिक फाट्याला जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो. टोल नाका बंद झाल्याने मध्यंतरी काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, दि. ५ जानेवारी २०२३ पासून पुन्हा टोलवसुली केली जात आहे.

वास्तविक, टोलनाक्यामुळे अनेक गावांना त्याचा फटका बसणार असून नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार आहे. तसेच, या टोलची मुदत ८ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री १२ नंतर समाप्त झाली होती. त्यामुळे मेसर्स ए टी आर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला (आयआरबी) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पथकर वसुली बंद करण्याचा आदेश दिला होता. आता पुन्हा नव्याने गुरुवार (दि.५) पासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे, ही बाब अन्यायकारक आहे, असेही दीपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.

*****

प्रतिक्रिया :
स्थानिक नागरिकांच्या वाहनांना २० किलोमीटर प्रवासाचा सवलतीचा ३१५ रुपये किमतीचा मासिक पास घ्यावा लागणार आहे. याबाबत जाहीर प्रकटन प्राधिकरणाने प्रसिद्ध केले आहे. पुढील एक वर्षासाठी हे दर असणार आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाप्रति संताप आहे. त्यामुळे टोलवसुली तात्काळ बंद करण्याचा निर्णय घ्यावा आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

  • दीपक मोढवे-पाटील, शहराध्यक्ष, भाजपा, वाहतूक आघाडी, पिंपरी-चिंचवड.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा