घर Pimpri-Chinchwad “पीसीएमसी १०० भ्रष्टाचार की एक बात” मालिकेतील चौथा भाग ; “मोकाट कुत्र्यांचे...

“पीसीएमसी १०० भ्रष्टाचार की एक बात” मालिकेतील चौथा भाग ; “मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया घोटाळा”

324
0

महापालिकेचा अजब विक्रम – एकाच दिवसात ठेकेदाराकडून करून घेतल्या ९७ कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्रक्रिया.

गेल्या काही दिवसांपासून आपण पिंपरी चिंचवड महापालिकेत घडलेल्या विविध आर्थिक अनियमितेबद्दल तीन प्रकरणे पाहिलेली आहेत. झोपडपट्टी पुर्नवसन घोटाळा, भरती घोटाळा, मुदत निधी घोटाळा आपण पाहिला. आज मालिकेतील चौथा घोटाळा आपण पाहणार आहोत तो मोकाट कुत्र्यांचा निर्बीजीकरण घोटाळा – विजयकुमार पाटील

विश्व सह्याद्री न्यूज – मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी दिनांक १/०३/२०१३ ते ३१/०३/२०१३ दरम्यानचे ५४७ रुपये प्रति एक कुत्र्याचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया या प्रमाणे एकूण २९२३ कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया केल्याबद्दल ठेकेदार मेसर्स अँनिमल प्रोटेक्शन क्लब कराड. यांचे एक बिल रुपये १५९८९४०.०० (अक्षरी रुपये पंधरा लाख अठ्ठ्यांणव हजार नऊशे चाळीस ) महापालिकेत पेमेन्ट घेणेसाठी जमा झाले आणि मार्च २०१३ मध्येच तात्काळ ते त्या ठेकेदारास वर्गही करण्यात आले. सदरच्या ठेकेदारास सहा टप्प्यात एकूण ७३६६ कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या त्याबदल्यात एकूण ४०२९२११.०० (चाळीस लाख एकोणतीस हजार दोनशे अकरा) वर्ग करण्यात आले. परंतु हे पेमेंट वर्ग करत असताना सर्व नियम पायदळी तुडवले गेले. आणि इथेच मोठा भ्रष्टाचार घडला.
दिवसाला ९७ कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एका महिन्यात २९२३ (दोन हजार नऊशे तेवीस) मोकाट कुत्री पकडली.असच ह्या बिलावरून स्पष्ट होते. एवढी सुपरफास्ट कुत्रे पकडण्याची सर्व्हिस आपले कर्मचारी देऊ शकतात? हाच एक संशोधनाचा भाग आहे.बर ती पकडून तात्काळ निर्बीजीकरणंही कसे होऊ शकते हे आता पालिकेने स्पष्ट करणे गरजेचे आहे.

केंद्रशासनाचे असाधारण राजपत्र क्रमांक ९२९ – २४/१२/२००१ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात प्रसिद्ध झाले आहे.त्यानुसार महापालिकेने आपल्या हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढू नये यासाठी एक निविदा क्रमांक १/२०११-१२ ह्या नुसार मे अँनिमल प्रोटेक्शन क्लब यांना रुपये ५४७ प्रति निर्बीजीकरण शस्त्रक्रिया असे दर निश्चित केले होते.त्यानुसार त्यांना कामाचे आदेश ९११ दिनांक २१/१२/२०११ रोजी देण्यात आले. सदरचा करारनामा हा २०/०९/२०११ रोजी करण्यात आला होता. परंतु सदर करारनामा सील करण्यापूर्वीच दिनांक २५/०४/२०१२ रोजी रुपये १०५५७१.०० त्यांना प्रदान करण्यात आली. निविदा अट शर्थीनुसार महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ५(१)२ नुसार करारनामा सील केल्यानंतरच बिल प्रदान करण्याची तरतूद आहे.
हे सर्व नियम धाब्यावर ठेवून, नोंदवही ची पडताळणी, तसेच , तपशीलवार कुत्र्यांचा अहवाल न तपासता फक्त बिल स्वीकारून लाखो रुपये अदा करणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो.

ह्या ठेकेदारास ……..
★टप्पा क्रमांक १ – २१/१२/२०११ ते २५/०४/२०१२ ह्या १३१ दिवसांमधील १९३ कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया करिता (सरासरी दिवसा ०६ कुत्रे)रुपये १०५५७१.०० रुपये अदा केले गेले.
★ टप्पा क्रमांक २ – २५/०४/२०१२ ते ०६/८/२०१२ ह्या १०३ दिवसांमधील ९२४ कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया करिता (सरासरी दिवसाला ०९ कुत्रे ) रुपये ५०५४४०.०० अदा केले गेले
★ टप्पा क्रमांक ३ – ०६/०८/२०१२ ते १८/०९/२०१२ ह्या ४३ दिवसांमधील ७८६ कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया करिता (सरासरी दिवसाला १८ कुत्रे ) रुपये ४३०११०.०० अदा केले गेले.
★टप्पा क्रमांक ४ – १८/०९/२०१२ ते २/१०/२०१२ ह्या १४ दिवसामधील ७४६ कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया करिता (सरासरी दिवसाला ५३ कुत्रे) रुपये ४०८२४०.०० अदा केले गेले.
★ टप्पा क्रमांक ५ – ०२/१०/२०१२ ते ०१/०३/२०१३ या १५२ दिवसामधील १७९४ कुत्र्यांच्या शस्रक्रिया करिता(सरासरी दिवसाला १२ कुत्रे) रुपये ९८०९१० अदा केले गेले.
★ टप्पा क्रमांक ६ – ०१/३/२०१३ ते ३१/०३/२०१३ या ३० दिवसामधील २९२३ कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया करिता (सरासरी दिवसाला ९७ कुत्रे) रुपये १५९८९४०.०० अदा केले गेले.
वरील ६ टप्प्यांचा अभ्यास केला असता कसे प्रशासन व ठेकेदाराची बिल रिंग कशी तयार झाली हे समजून येते.

अश्या पद्धतीने ०६ टप्प्यात ७३६५ कुत्र्यांची निर्बीजीकरणं शस्त्रक्रिया एका आर्थिक वर्षात दाखवली गेली व त्यापोटी एकूण रुपये ४०२९२११.०० ठेकेदारास अदा केले गेले. प्रतक्ष्यात मात्र त्याची नोंदवही व तपशील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. ह्या मागे आर्थिक लाभापोटी सुनियोजित घोटाळा केला गेला.

सन २०१३ ते २०२२ पर्यंतच्या ९ वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे ६५००० हजारपेक्षा जास्त मोकाट कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया पार पडली असती व एकही मोकाट कुत्रा पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत दिसला नसता. भ्रष्ट कारभारामुळे आज शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या लाखो झाली आहे. अनेक नागरिकांचे प्राण मोकाट कुत्र्यांमुळे संकटात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा