घर Pimpri-Chinchwad आक्रमक राहणे ही काळाची गरज ः प्रशिक्षक लतेंद्र भिंगारे

आक्रमक राहणे ही काळाची गरज ः प्रशिक्षक लतेंद्र भिंगारे

168
0


चिंचवड 13 ः चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज इन्स्टिट्युटमधील कला, वाणिज्य, विज्ञान आदी शाखेत शिकणार्‍या विद्यार्थीनीसाठी ‘निर्भया कन्या अभियान’ राबविण्यासंदर्भात संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, समन्वयिका प्रा. रुतुजा चव्हाण, प्रा. सुरुची सोमवंशी, प्रा. तुलुका चटर्जी, प्रा. ज्योती इंगळे आदींनी या संदर्भात बैठक घेवून प्रदीर्घ चर्चा करून महाविद्यालयात ये-जा करताना आवाराबाहेर तसेच रस्त्यात समाजकंटापासून होणारी छेडछाड, स्वसंरक्षण विद्यार्थीनीमध्ये आत्मविश्वास जागृत करून स्वाभीमानाने शिक्षण पूर्ण करता यावे, प्रसंगी त्यांचे स्वसंरक्षण करता यावे, यासाठी निनाद फाऊंडेशनचे संस्थापक अजय भोसले समवेत बैठक घेवून विद्यार्थीनींसाठी तीन दिवसीय ‘मर्दानी प्रशिक्षण’ मोहीम राबविण्याचा निर्णय संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी घेतला. त्यानूसार तीन दिवसीय आरोग्य, मानसिक, शारीरिक दृष्ट्या समक्षीकरण, समुपदेशन, प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण उद्घाटन समारंभाच्या वेळी मुख्य प्रशिक्षक लतेंद्र भिंगारे मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, संस्था महाविद्यालयात विविध शाखेत शिक्षण घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सदैव प्रयत्नशील असते. विद्यार्थीनींना शिक्षणाबरोबरच त्याचे आरोग्य मानसिक, शारिरीकदृष्ट्या सक्षमीकरण होण्यासाठी समुपदेशन व प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.

प्रशिक्षक लतेंद्र भिंगारे पुढे म्हणालेे, प्रत्येक विद्यार्थीनींना जिद्द, प्रयत्न, सहनशीलता या तीन गोष्टी अंगिकारा रोजच्या जीवनात कला, क्रीडा, क्षेत्राकडे दुर्लक्ष करू नका. आपला अनमोल वेळ वाया घालवू नका. आवाजात आक्रमकता ठेवा दोन शब्द लक्षात ठेवा ऐकून घेण्याची क्षमता असते, तो निर्णय घेतो तोच यशस्वी होतो. जीवनात यश, सुख, संपत्ती, प्रेम, सुरक्षितता यातील एक गोष्ट नाही मिळाली तरी जीवन अधूरे राहते. सुरक्षितता अनेक प्रकारची असते. प्रसंगी समाजातील अप्रिय घटना पाहून रक्तही सळसळते अनेक भाव मनात येतात, ती आपली हतबलता असते. कारण आत्मविश्वासाची कमतरता आपल्यात असते. शब्दात ताकद असते प्रतिकार व प्रतिसाद तुम्ही कोणत्या गोष्टीला देता त्यावर तुमचे जीवन यशस्वी होते. निर्भीड व स्वाभिमानी आयुष्य जगा, दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. आपण जगाकडे पाहत असतो. परंतु, जग आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतोय हे आत्मसात करा. आहारावर विशेष लक्ष द्यावे, घरात जेवताना किरकिर करू नका, येता-जाता आत्मविश्वासाने व डौलदारपणे चाला, मानसिकता आपल्या हातात नसली तरी तात्पुरते आयुष्य जगू नका. तुम्ही इतरांचे कौतुक करता. परंतु, तुमचे कौतुक इतराने करावे, ही भूमिका प्रत्येकाने आपले जीवन जगताना अंगिकारावे, आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

समारोप कार्यक्रमात उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी म्हणाल्या, आज संस्थेच्या पुढाकाराने सुमारे 110 सहभागी विद्यार्थीनींना मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाले, ही आनंदाची बाब आहे. महाविद्यालयीन आयुष्य जगताना मैत्री काळजीपूर्वक करून आम्ही अबला नाही सबला आहोत. हे कृती रुपी समाजाला भावी काळात दाखवून द्यावे, असे आवाहन करून सर्व प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांना त्यांच्या हस्ते प्रत्येकाला सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुलीका चटर्जी यांनी केले. तर, प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयिका प्रा. रुतूजा चव्हाण, प्रा. सुरूची सोमवंशी, प्रा. ज्योती इंगळे, निनाद फाऊंडेशनचे प्रशिक्षक भाग्यश्री बोराटे, श्रीकांत तिळवे, कल्याणी दारवटकर, वैभवी सोनावणे, सचिन खटके आदींनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा