घर Pimpri-Chinchwad चिंचवड देवस्थानातील, चिंचवडगावला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

चिंचवड देवस्थानातील, चिंचवडगावला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

182
0

461 व्या श्रीमन् महसाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

पिंपरी, 10 डिसेंबर –  चिंचवड देवस्थानाला 500 वर्षे पूर्ण होत आले आहेत. पण, इतक्या मोठ्या देवस्थानातील, चिंचवडला अद्याप ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचाही दर्जा मिळाला नाही. याचे मला आश्चर्य वाटते आणि धक्काही बसतो. ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी कोणतीही कागदपत्रे पूर्ण करावी लागत नाहीत. त्यासाठी तत्काळ चिंचवड देवस्थानातील, चिंचवडगावला  ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच ‘क’ वर्ग म्हणून यावर्षी जो निधी मिळेल, तो लगेच देतो. त्यानंतर ‘ब’ आणि  ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित 461 व्या श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आज (शनिवारी) उद्घाटन झाले.  याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे,  भाजपचे चिंचवड निवडणूक प्रभारी शंकर जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, धर्मदाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के,  चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त  मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार तसेच माजी नगरसेविका अश्विनी जगताप,  उषा मुंडे, अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक एकनाथ पवार, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे,  आदी उपस्थित होते.  दरम्यान, 10 ते 14 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, सुगम संगीत, जुगलबंदी तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी कार्यक्रम होणार आहेत.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ”चिंचवड देवस्थानाला शहाजी महाराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज, बाजीराव पेशवे अशा अनेकांनी त्या-त्यावेळेला खूप मदत केली. श्रद्धेने मदत केली. देवस्थानामुळे चाललेल्या उपासनेमुळे प्रजेला सुख आणि समाधान मिळणार आहे. त्यामुळे संस्थान चालण्यासाठी अनेक गावे इनाम करुन दिली. धान्याच्या वाहतुकीसाठी परवाने, गायी, गुरांसाठी गायरानासह अनेक जमिनी इनाम दिल्या. या सगळ्या वैभवाचा विचार करता हे देवस्थान अशाच पद्धतीने उत्तम चालण्यामध्ये विश्वस्तांसोबच राजकीय नेते आणि भाविकांची मोठी जबाबदारी आहे”.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, ”अष्टविनायकाला भाविक मोठ्या संख्येने जातात. पण, रस्ते व्यवस्थित नव्हते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना 30 हजार कोटींचे रस्ते ठरवले होते. अष्टविनायकला जाणारे रस्ते जोडण्यावर भर दिला. ते रस्ते आता पूर्ण होत आले आहेत. धार्मिक संस्थानाला बळकटी दिली पाहिजे. धार्मिक संस्थानातून नितिमत्तेचे शिक्षण भेटते. देव आपल्याला चांगले वागण्याची प्रेरणा देतो. राजकीय नेत्यांनी धार्मिक कार्यही केले पाहिजे.  अशा प्रकारच्या साधनेतूनच एक ताकद आपल्यात निर्माण होते”.

”अर्ध्या तासापूर्वी माझ्यावर हल्ला झाला, हल्लेखोरांना वाटले होते की आता गर्भगळीत होतील, हे लपून बसतील. पण, शर्ट बदलला आणि मी कार्यक्रमाला आलो. ही ताकद मला साधनेतून  मिळाला. ही परमेश्वराने चालविलेला खेळ आहे. या खेळात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मला सावित्रीबाई फुले आठवल्या. सावित्रीबाई मुलींना शिकविण्यासाठी जाताना लोक त्यांच्यावर शेण मारायचे. मी सावित्रीबाई यांच्याशी तुलना करत नाही. पण, मी त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. त्यामुळे मी बॅगेतील शर्ट काढला आणि कार्यक्रमाला आलो.  विरोधकांना नामोहरम करण्याची ताकद परमेश्वर, साधना देते. गोंधळानंतर अनेकांना वाटले असेल मी पुण्यात जातो. पण, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि कोल्हापूरही माझे घर आहे. साधू संतानी सांगितले आहे हे विश्वची माझे घर, झाडे, फुले हे सगळे आपले सगे सोयरे आहेत. त्यामुळे हल्ला करणाराही सोयराच म्हणावे लागेल”, असेही पाटील म्हणाले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”क्रांतिकारक आणि मोरया गोसावी महाराज यांची ही भूमी आहे. या भूमीचा आम्हाला मोठा आदर आहे. चिंचवड देवस्थानच्या माध्यमातून भक्तांना चांगल्या सुविधा दिल्या जातात. धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. गणपतीला आपण विघ्नहर्ता म्हणतो. सध्या समाजामध्ये जे चालले आहे. त्या वाईट प्रवृत्तींना गणरायाने चांगली बुद्धी द्यावी”. आमदार महेश लांडगे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवडची भूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. अशा या भूमीत चिंचवड देवस्थान ट्रस्ट अतिशय चांगले काम करत आहे”.

धर्मदाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के म्हणाले, ”चिंचवड देवस्थानाच्या विकासाला शासकीय मान्यता, कोणताही कामासाठी आडकाठी येणार नाही. ट्रस्टचे शिस्तबंध काम चालले आहे. दैवी देणगी असलेल्या देव कुटुंबाच्या माध्यमातून न्यासाचा कारभार पारदर्शक होईल. ट्रस्टकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही असे कामकाज होईल”.

मयुरेश्वर महात्म्य या नवीन आवृत्तीचे आणि देवस्थानच्या सन 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त विनोद पवार यांनी केले. विश्वस्त जितेंद्र देव यांनी दिनदर्शिकेची माहिती दिली. विश्वस्त आनंद तांबे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा