पुणे : ‘लिहित राहा, वाचत राहा.. व्यक्त होत राहा ! ‘ अशा शब्दात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी तरुणाईला शनीवारी संदेश दिला.
डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मधील ‘ सो कूल… सोनाली ‘ या संवाद सत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. सोनाली कुलकर्णी यांनी या सत्रात त्यांच्या लेखन, वाचन प्रवास उलगडला. फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात आर.जे. बंडया यांनी ‘सो कुल … सोनाली’ या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.
त्या म्हणाल्या, ‘ आपल्या मनातील खळबळ असो, की शांतपणा, तो लिहिणं महत्वाचं. आपला भाव सर्वांपर्यंत पोहोचविणे लेखनाने सोपे होते.डॉ. माधवी वैद्य यांनी मला कविता शिकवली. विजय तेंडूलकर, गिरीश कर्नाड, सत्यदेव दुबे, डॉ. जब्बार पटेल यांचा सहवास लाभला. उत्कृष्ट माणसं आयुष्यात भेटली. त्यांनी मला घडवलं.
‘सोशल मीडियावर लिहित राहा, लेखक म्हणून प्रवास सुरु ठेवावा.पण, त्याची लिंक पाठवू नये ‘, अशी टीप सोनाली कुलकर्णी यांनी दिली.
‘आता मला वाचून वाचून चष्मा लागला आहे.घरात पुढच्या पिढीने वाचावे, याचा प्रयत्न मी करते ‘. रात्री झोपण्याआधी थोडं तरी वाचन करण्याची सवय असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘शहरात प्रश्न वाढले आहेत. माध्यम वाढल्याने वेळही कमी पडतो. पर्याय वाढले आहेत. वाचनासाठी वेळ कसा काढावा, प्रश्न पडतो. तरीही आवडेल ते वाचत राहावं. लिहित राहावे ‘, असेही त्यांनी सांगीतले.