घर Pimpri-Chinchwad प्लांट हेडने कामगारांना दिली जीवे मारण्याची धमकी, ठेकेदाराने केली मारहाण; चाकण येथील...

प्लांट हेडने कामगारांना दिली जीवे मारण्याची धमकी, ठेकेदाराने केली मारहाण; चाकण येथील डायचांग इंडिया सिट कंपनीतील धक्कादायक प्रकार    

177
0

कंपनीतील अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बुधवारी कामगारांचे पिंपरीत उपोषण

पिंपरी, 22 नोव्हेंबर – कामगार संघटनेचे सदस्यत्व  स्वीकारुन युनियन केल्याचा राग आल्याने कामगारांना मारहाण करणा-या, जीवे मारण्याची धमकी देणा-या कोरीयन ग्रुपच्या चाकण येथील डायचांग इंडिया सिट कंपनीतील अधिकारी, कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करावा, कामगारांना त्यांच्या कर्तव्यावर कायदेशीर पद्धतीने कंपनीच्या हजेरी पत्रकावर कायम करुन घ्यावे, या मागण्यांकरिता सुमारे 123 कामगार बुधवार (दि.23) पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे सर्व कामगार उद्यापासून उपोषणला करणार आहेत. हे कामगार चाकण येथील कंपनीजवळ उपोषणाला बसल्यास कंपनीचे अधिकारी, त्यांचे गुंड कामगारांना मारहाण करतील. त्यामुळे घटनाकार डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर कामगारांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. चाकण, खराबवाडीतील मे. डायचांग इंडिया सिट कंपनीत हे कामगार  गेली अनेक वर्ष काम करत आहेत. कायदेशीररित्या कंपनीत 240 दिवस नोकरी केल्यानंतर त्या कामगारांना कंपनी सेवेत कायम करायला पाहिजे. परंतु, तसे न करता या कामगारांना 2 वर्षे ट्रेनी ठेवण्यात आले. त्यानंतर बेकायदेशीरपणे कंत्राटी पद्धतीने ठेवले.

कामगारांना कायदेशीर वेतन, सुट्या देखील मिळत नव्हत्या. कामगारांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. याबाबत संघटनेने अप्पर कामगार आयुक्तांना लेखी पत्राद्वारे कळविले. कंपनीला हे पत्र मिळताच प्लांट हेड राहुल गायकवाड, एचआर सिद्धार्थ भोसले, प्रोडक्शन मॅनेजर प्रशांत देसाई, डीसपॅच मॅनेजर विकास पाटील, कंत्राटदार प्रभु शिंदे यांनी ड्युटीवर असलेल्या कामगारांना बोलावून घेतले. ‘युनियनचा राजीनामा द्या, नाही तर आम्ही प्रत्येकाला मारु’, ‘पोलीस स्टेशन आमच्या ताब्यात आहे’, ‘आम्ही तुमच्या विरोधात खोट्या तक्रारी देवून तुम्हाला  तुरुंगात डांबु’ अशी धमकी दिली.

राकेश कुमार ठाकूर या कामगाराला 10 ऑक्टोबर 2022 रोजी प्लांट हेड गायकवाड याने केबिनमध्ये बोलावून घेतले. संघटना सोडण्यासाठी दबाव आणला, जीवे मारण्याची धमकी दिली. तर, प्रभु शिंदे या ठेकेदाराने या कामगाराला मारहाण केली. युनियन कोणी केली, याची विचारणा करुन कामगारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण झालेल्या कामगाराने म्हाळूंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी लेखी अर्ज दिला. वारंवार पोलिसांकडे जावूनही तक्रार दाखल करुन घेतली नाही. कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सर्व कामगार भीती, दहशतीखाली आहेत.

या कामगारांनी 14 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस आयुक्तांचीही समक्ष भेट घेतली. मारहाण झालेल्या कामगाराने सर्व घटनाक्रम आयुक्तांना सांगितला. त्यावर ‘तुमची तक्रार दाखल करुन घेतली जाईल. तसे म्हाळूंगे पोलीस स्टेशनला मी निर्देश देतो’, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. परंतु, अद्यापर्यंत तक्रार दाखल करुन घेतली नाही. या कामगारांना न्याय मिळावा, मारहाण करणा-या व जीवे मारण्याची धमकी देणा-या वरील अधिकारी व ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल व्हावा. गेली दोन महिन्यापासून कामावर येण्यास मनाई केलेल्या कामगारांना सेवेत कायम करुन कामावर घ्यावे या मागणीसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामगार उद्या (बुधवार) पासून न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे कार्यालयीन सचिव करण भालेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा