पिंपरी ः पिंपळे निलख येथील विशाल नगरच्या डीपी रोडवर रोज रात्री रस्त्यावर दारू पिऊन महिलांना विशेषतः तरूणींना येता – जाता त्रास देणाऱ्या टवाळखोरांना आज (बुधवारी) सायंकाळी माजी नगरसेवक तुषार कामथे यांनी गांधीगिरीने उत्तर देत समज दिली.
डीपी रोडवर असलेल्या वाइन शाॕप परिसरात पदपथावर बसून काही टवाळखोर तरूण दररोज दारू पिऊन धिंगाणा घालतात. हे तरूण नशेत फिरत महिलांना, तरूणींना त्रास देत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून नागरिक करीत होते. बुधवारी सासंकाळी माजी नगरसेवक तुषार कामथे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी डी पी रोड येथे जाऊन फूट पाथवर दारू पिणा-या व गोंधळ घालणाऱ्या प्रत्येकाला बोलावून त्याच्या हाती दारू ऐवजी दूधाने भरलेल्या बाटल्या व ग्लास सोपविले, तसेच त्यांना सौम्य भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला. समजावून देखील हा प्रकार बंद झाला नाही, तर चोख कृतीतून उत्तर दिले जाईल असा सज्जड दम दिला.
या प्रकारानंतर बेवड्या तरुणांनी घटना स्थळावरून काढता पाय घेतला. या गांधीगिरीबद्ल नागरिकांनी विशेषतः महिला वर्गाने तुषार कामथे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.