घर Uncategorized पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक अशा विविध पुरस्कार...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक अशा विविध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

238
0

पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२२ :- मानवजातीच्या दृष्टीकोनातून शिक्षकांचे स्थान  महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी घडवण्यासोबतच  राष्ट्र घडवण्याचे आणि संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे  कार्य  त्यांच्या हातून होत असते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय  योगदानासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानीत करणे हा आनंदी क्षण आहे,  अशा शब्दांत  मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना  केंद्रबिंदू मानून  गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नात्यांची वीण अधिक घट्ट करावी, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

          शिक्षकदिनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक अशा विविध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पीसीएमसी पॅटर्नचे उद्घाटन करण्यात आले.  महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संदिप खोत, क्रीडा विभागाचे उपआयुक्त विठ्ठल जोशी, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, सहायक प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षिका अनिता जोशी, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. श्रीरंजन आवटे, आकांक्षा फाउंडेशनच्या संचालिका जयश्री ओबेरॉय, लीडरशिप फॉर इक्विटीचे मयुरेश भोईटे यांच्यासह पुरस्कारार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.

          खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे म्हणाले,  शिक्षक हे  केवळ वेतनभोगी कर्मचारी नसून प्रसंगी ते विद्यार्थ्याच्या गुरुसह आई,वडील,भाऊ, बहिण अशा विविध भूमिका बजावत असतात. त्यातून ते विद्यार्थ्यांना घडवण्यासोबत त्यांच्या जीवनाला चांगला आकार देण्याचे कार्य करत असतात. शासनाने दिलेल्या जबाबदा-या देखील ते प्रामाणिकपणे पार पाडत असतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका शाळांना पुरेशा सेवा सुविधा पुरवल्या जातात. या शहरात काम करणारे शिक्षक  एका अर्थाने भाग्यवान आहेत. परंतु ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणारे शिक्षक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून  ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. मराठी माध्यमांमध्ये प्रवेश घेण्याचा कल कमी झाला असून इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. असे असले तरी स्थानिक प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका प्रयत्नशील असते. महापालिका शाळेतील विद्यार्थी सर्वसाधारण परिस्थितीतून येत असतात. त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची असून ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

          आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, देशातील सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या एक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या ही  अभिमानाची गोष्ट  आहे. शिक्षणक्षेत्रात सुधारणेला नेहमीच वाव असतो. महापालिका शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यमापन करून त्याची शिक्षणातील गती तपासण्यावर भर दिला जाणार आहे. कोरोना काळात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर झालेला परिणाम विचारात घेता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी  सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पीसीएमसी पॅटर्नबद्दल माहिती सांगितली. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरविल्यास ते स्वतःच्या सर्वांगीण विकासासोबत शहराच्या  नावलौकिकात भर टाकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढील काही वर्षांत महापालिकेच्या शाळांना भेट देण्यासाठी बाहेरील राज्यांतील व्यक्ती,शाळा आणि संस्था भेट देण्यास येतील या दृष्टीने  हा उपक्रम सर्वाथाने यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांच्या सहभागातून सर्वोतोपरी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले.

यावेळी आदर्श शिक्षक आणि शाळांना पुरस्कार देण्यात आले यामध्ये आदर्श शिक्षिका उषा तापकीर, अलका बेलापूरकर, जयश्री गायकवाड, अपर्णा साळवी, सुजाता लोखंडे, वनिता नेहे, सविता माने, अरुणा महानवर, मंगल राऊत, शितल काकडे, कल्पना जाधव, अपर्णा ढोरे, शोभा टिळेकर, सुनिता शिंदे, माधुरी कुलकर्णी, दिव्या भोसले, हंसा लोहार, विद्याराणी वाल्हेकर, सुजाता श्रीसुंदर, आशा देशमुख, सुमंगल चोपडे, आशा निगडे, निता खाडे तसेच आदर्श शिक्षक संदीप वाघमारे, दत्तात्रय पवार, संतोष भोते, सुभाष कांबळे, राजू भगत, नवनाथ शिंदे, विजय लोंढे, विलास पाटील, राजेंद्र कांगुडे, विक्रम मोरे यांचा समावेश आहे.  आदर्श शाळांमध्ये कुदळवाडी प्राथमिक शाळा क्र. ८९, जयवंत प्राथमिक शाळा भोईरनगर, माध्यमिक विद्यालय थेरगाव, यशस्वी माध्यमिक विद्यालय मोशी या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला.    श्रीमती लिलाबाई कांतीलाल खिंवसरा, प्राथमिक शाळा मोहननगर, आकांक्षा फाऊंडेशन  संचलित मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा बोपखेल या शाळांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.  अन्नामृत फाऊंडेशन यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच लेखक श्रीरंजन आवटे यांचे समकालीन शिक्षण समोरील आव्हाने या विषयावरील व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे अविनाश वाळुंज यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा