घर Pimpri-Chinchwad भोसरी महोत्सव शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू : आमदार महेश लांडगे

भोसरी महोत्सव शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू : आमदार महेश लांडगे

253
0
पिंपरी,पुणे (दि. २ सप्टेंबर २०२२) : भोसरी कला, क्रीडा मंचच्या वतीने आयोजित केलेला भोसरी महोत्सव हा पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरला आहे. देशभर मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला मोठा प्रबोधनाचा, संस्कृतीचा वारसा लाभला आहे. तो वारसा जपण्याचे व वृद्धिंगत करण्याचे काम पुढील काळात या मंच माध्यमातून होईल असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
भोसरी कला, क्रीडा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या “भोसरी महोत्सव २०२२” चे उद्घाटन गुरुवारी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झालेल्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार अमर साबळे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निर्मिती सावंत, संयोजक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत नाना लोंढे, जेष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविका सुनंदाताई फुगे, सारिका लांडगे, सोनाली गव्हाणे, संयोजन समितीचे विजय फुगे, भरत लांडगे सुनील लांडगे किशोर गव्हाणे, निवृत्ती फुगे, राजेंद्र सोनवणे, संजय बेंडे, नंदू लोंढे, श्याम लांडगे,भानुदास फुगे, लक्ष्मण काचोळे, विजय शिनकर आदी उपस्थित होते.
माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील शुभेच्छा देताना म्हणाले की, भोसरी गावाला इतिहासकालीन संस्कृतीचा वारसा आहे. तसेच शेती, पहिलवान, गावजत्रा, बैलगाडा शर्यती बरोबरच आता वेगाने विस्तारणाऱ्या उद्योग, व्यापार, कामगार क्षेत्रामुळे भोसरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ॲड. नितीन लांडगे आणि विजय फुगे तसेच त्यांचे सर्व सहकारी भोसरी कला, क्रीडा मंचच्या माध्यमातून याचा नावलौकिक आणखी वाढवतील.
माजी खासदार अमर साबळे यांनी सांगितले की, संयोजकांनी समय सूचकता पाळून या महोत्सवात आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे उपस्थित नागरिकांना आनंद आणि सुख मिळणार आहे.
स्वागत, प्रास्ताविक करताना ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले की, सतरा वर्षांपासून भोसरी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. येथील नागरिकांना आपल्या व्यस्त कामातून विरंगुळा मिळावा. मनोरंजनातून प्रबोधन व्हावे. स्थानिक कलाकारांना सक्षम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने स्थानिक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन हे मंचची स्थापना करण्यात आली.
छाया चित्रकार नंदू लोंढे यांच्या फोटोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ही करण्यात आले.
सूत्र संचालन प्रा. दिगंबर ढोकले तर आभार विजय फुगे यांनी मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा