पिंपरी,ता. १८ : नियोजित वेळेनंतर तब्बल दोन तास उशिरा सुरु झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘भाजप हटाव’ आंदोलन म्हणजे निवळ स्टंटबाजीचा देखावा ठरले. शुक्रवारी दुपारी झालेल्या या आंदोलनात विविध झोपडपट्यांतील शेकडो भाडोत्री लोकांचा भरणा होता. सहा ते सात खासगी बसमधून या लोकांना मोबदला देऊन चिंचवड स्टेशन येथे पाचारण करण्यात आले. मुद्द्यांचा अभाव आणि विस्कळीत नियोजनामुळे हे आंदोलन एक मोठा फ्लॉप शो ठरला.
राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे, योगेश बहल, मंगल कदम, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ आदी एका मोठ्या वाहनात उभे राहून घोषणाबाजी करीत होते. तर, रस्त्यावर जमवलेल्या गर्दीकडून अजित पवार यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या. हे आंदोलन कशासाठी याची माहीतच गर्दीतील लोकांना नव्हती. केवळ भाडोत्री लोकांचा भरणा करुन राजकीय स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मोर्चाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र दिसूनआले. पक्षाचे असंख्य कार्यकतें आणि काही नगरसेवक मोर्चाच्यावेळी अनुपस्थित होते. वास्तविक, नवे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. त्याचे नीट नियोजन करता आले असते. परंतु, आंदोलनातील विस्कळीतपणा पाहता गटबाजीचे गारुड अजूनही पक्षाच्या मानगुटावरून हटलेले नाही हेच आजच्या फसलेल्या आंदोलनावरून स्पष्ट झाले.