घर Politics ‘काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचे मार्ग वेगवेगळे’

‘काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचे मार्ग वेगवेगळे’

408
0

ममता बॅनर्जी यांचा पवित्रा

कोलकाता: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपविरोधातील संभाव्य आघाडीत काँग्रेसला स्थान नाही, हे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे कोणत्याही प्रादेशिक पक्षाशी सौहार्दपूर्ण संबंध नसल्याने काँग्रेसने त्यांच्या मार्गाने जावे, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ, असे बॅनर्जी यांनी सुनावले आहे.

रविवारी ममता यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. लवकरच भाजपविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय या चर्चेत घेण्यात आला. चंद्रशेखर राव आणि बॅनर्जी आघाडीसंदर्भात लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आम्ही सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन देशाची संघराज्य संरचना वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी प्रादेशिक पक्षांमध्ये मतैक्य घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे असे बॅनर्जी यांनी सांगितले

देशभरातील प्रादेशिक पक्षांना एकत्र करून केंद्रीय पातळीवरील नेतृत्व करण्याच्या बॅनर्जी यांच्या विचारला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार झटका दिला होता. भाजपविरोधात विरोधी ऐक्य काँग्रेसला वगळून निरर्थक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, ममता यांना के चंद्रशेखर राव आणि एम के स्टॅलिन यांचा पाठिंबा मिळाला आहे. राव यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि स्टॅलिन यांच्याकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना आघाडीच्या बाजूने वाळविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील राज्यपालांच्या; पर्यायाने मोदी सरकारच्या भूमिकेवर नाराज आहेत. अशा स्थितीत या मोहिमेला उद्धव ठाकरे आणि जगनमोहन यांनी पाठिंबा दिल्यास प्रादेशिक पक्षांची आघाडी भक्कम होण्याची शक्यता आहे मात्र, त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत भर पडणार आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रादेशिक पक्षांच्या संयुक्त आघाडीचे भवितव्यही बऱ्याच अंशी अवलंबून असेल. या निवडणुकांमध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करू शकली नाही तर आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस उत्तर प्रदेशात पाय रोवण्याचा प्रयत्नांना वेग देण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याबरोबर ममता यांचे निकटचे नाते आहे. आगामी काळातील धोरण नजरेसमोर ठेऊनच ममता यांनी उत्तरप्रदेशात समाजवादी उमेदवारांचा प्रचार केला आहे.

भारतीय जनता पक्षाला सशक्त पर्याय उभा करण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचे ममतांना पाठींबा देणाऱ्या पक्षांचे मत आहे. बिगरभाजप-बिगरकाँग्रेस विरोधकांना एकत्र आणून काँग्रेसला फारसे आढेवेढे न घेता गुडघ्यावर आणणे आणि प्रादेशिक पक्षांच्या आघाडीला पाठिंबा देण्यास भाग पाडणे ही बॅनर्जी यांची रणनीती आहे. सध्याच्या काळात देशातील संघराज्य संरचना धोक्यात आली आहे. आम्ही संघीय संरचना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा आव्हानात्मक काळात सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एका व्यासपीठावर आणणे हे काँग्रेसचे कर्तव्य होते. मात्र, काँग्रेस ती जबाबदारी पार पाडू शकलेली नाही, असे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा