घर India हिजाब प्रकरणी भारताचा पाकिस्तानवर पलटवार

हिजाब प्रकरणी भारताचा पाकिस्तानवर पलटवार

365
0

नवी दिल्ली: कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादावर पाकिस्तानने प्रश्न उपस्थित केल्यानंतर भारतानेही पाकिस्तानवर पलटवार केला आहे. भारतीय राजदूताने पाकिस्तानने केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे नमूद केले आहे. भारतावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी तुमच्याकडील परिस्थिती तपासून बघा; या शब्दात भारतीय राजदूताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. भारत वर्षानुवर्षे धर्मनिरपेक्ष आहे आणि पुढेही राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही पाकिस्तानी मंत्र्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले असून भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून काही लोक गणवेश आणि शिक्षणसंस्थांच्या शिस्तीच्या निर्णयाला जातीय, धार्मिक रंग देत आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अधिकार निर्लज्जपणे पायदळी तुडवले जात आहेत, असे नकवी म्हणाले. मुस्लिमांसह अल्पसंख्याकांचे समान हक्क, सन्मान, समृद्धी, सहिष्णुता, सौहार्द आणि सर्वसमावेशकतेसाठी भारत नेहमीच कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांकडे धार्मिक असहिष्णुता, नकारात्मक रूढी, कलंक आणि भारतातील मुस्लिमांना सामोरे जावे लागत असलेल्या भेदभावाबद्दल पाकिस्तानने चिंता व्यक्त केली आहे. भारत सरकारने कर्नाटकातील महिलांचा छळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि मुस्लिम महिलांची सुरक्षा
आणि कल्याण यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या पाहिजेत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या मरियम नवाज हिने ट्विटरवर कर्नाटकातील एका मुस्लिम मुलीचे छायाचित्र पोस्ट करून भारतावर टीका केली आहे. मुस्लिम मुलींना शिक्षण नाकारणे हे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. भारतातील मुस्लिमांच्या दडपशाहीचे नियोजन केले जात आहे, अशी टीका या पूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी केली आहे. मोदींच्या भारतात जे काही चालले आहे ते भयावह आहे. अस्थिर नेतृत्वाखाली भारतीय समाज वेगाने अधोगतीकडे जात आहे. इतर कोणत्याही पोशाखाप्रमाणे हिजाब घालणे ही वैयक्तिक पसंतीची बाब आहे, अशी टीका पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा